Lumpy Skin : हिमाचल प्रदेशात लम्पी व्हायरसने (Lumpy Virus) थैमान घातले आहे. लम्पी विषाणूमुळे प्राणी सातत्याने मृत्यूमुखी पडत असून संख्येत वाढ होत आहे. हिमाचलमध्ये (Lumpy Skin Disease In Himachal Pradesh) आतापर्यंत 4 हजार 567 जनावरांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे, तर 83 हजार 790 जनावरे बाधित आहेत. हिमाचल प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री वीरेंद्र कंवर यांनी ही माहिती दिली आहे.

पशुसंवर्धन मंत्री वीरेंद्र कंवर म्हणाले की, आतापर्यंत 2 लाख 26 हजार 351 जनावरांना रोग प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. राज्यात 83 हजार 790 जनावरांना या आजाराची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 4567 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये संसर्गाचे प्रमाण 10 ते 20 टक्के आहे आणि मृत्यू दर 1 ते 5 टक्के आहे. राज्यात 22 जून रोजी चायली, शिमला येथे लम्पी रोगाचा पहिला रुग्ण आढळून आला होता, ज्याची 29 जून रोजी तपासणीनंतर खात्री करण्यात आली. यानंतर शासनाने कारवाईचा बडगा उगारला आणि 1 जुलै रोजी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

पशुसंवर्धन मंत्री म्हणाले की, सरकारने हा रोग रोखण्यासाठी आणि हिमाचलमधील पशुधन वाचविण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या दिवसापासून आवश्यक पावले उचलली असून लम्पीला महामारी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे. मंत्री म्हणाले की, कोरोनाच्या काळात माणसांचा मृत्यू झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) प्राण्यांच्या मृत्यूवरही राजकारण करत आहेत.

हिमाचलमध्ये लम्पी रोगामुळे जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई मिळेल असे मंत्री म्हणाले. मात्र, आजपर्यंत हिमाचलमध्ये एकाही मालकाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच हिमाचल सरकारने केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाबाबतही काही निर्णय झाला आहे. अशा परिस्थितीत या घातक आजाराने जनावरांच्या मृत्यूत मात्र सातत्याने वाढ होत आहे. शेजारील हरियाणा आणि राजस्थान या राज्यांतही परिस्थिती दिवसेंदिवस आधिक खराब होत चालली आहे.

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version