Gujarat Rain : गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक गावात पुराचा तडाखा बसला आहे.
यातच बुधवारी झालेल्या पावसामुळे 25 जणांना जीव गमवावा लागला. राज्यात पुरामुळे आतापर्यंत एकूण 35 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकार आणि प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोकांना केवळ अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच चौथ्या दिवशी राज्यातील अनेक भागांतील पूरग्रस्त भागातून प्रशासनाकडून सुमारे 17,800 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी, एअरफोर्स आणि भारतीय तटरक्षक दलाकडून मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. गरज पडल्यास केंद्राकडून मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले.
12 तासात पावसाने कहर केला
पावसामुळे राज्यातील शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे शहरांमध्येही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदरसह सौराष्ट्र विभागातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे. गेल्या 12 तासात 50 मिमी ते 200 मिमी पाऊस झाला. द्वारका येथील भानवड तालुक्यात 185 मिमी पाऊस झाला, जो राज्यातील सर्वाधिक आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे संकट निर्माण झाले आहे.
वडोदरा शहरात सध्या पाऊस थांबला आहे मात्र विश्वामित्र नदी दुथडी भरून वाहत असल्याने सखल भागात पूर आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 41 हजार लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. 3000 लोकांचे प्राण वाचले आहेत.
याआधीही राज्यात पाऊस आणि पुरामुळे विध्वंस झाला आहे. सन 2017 मध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे हाल झाले होते. पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली, तर शहरांतील अनेक भागात घरांमध्येही पाणी शिरले. या आपत्तीत 70 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर हवाई दल आणि एनडीआरएफने सुमारे 25 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.