Take a fresh look at your lifestyle.

राज्यात मान्सूनचे पुन्हा कमबॅक; राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात ‘तिथे’ जोरदार बरसणार

मुंबई : हवामान विभागाने राज्यातील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, आता पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. येत्या दोन दिवसात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.

Advertisement

राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. या काळात राज्यात कुठेही फारसा पाऊस झालेला नाही. आता मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेही हवामान विभागाने याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज व्यक्त  केला होताच. हवामान विभागाने उद्यासाठी (5 सप्टेंबर) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, सातारा, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर 6 आणि 7 सप्टेंबर या दिवशी सुद्धा काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, आजही उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात येत्या 4 ते 5 दिवसांचा हा पावसाचा अंदाज आहे. मान्सून राज्यात पुन्हा परतत असल्याचे हे संकेत आहेत. यानंतर पाऊस कसा राहिल, याबाबत मात्र आताच सांगता येणे शक्य नाही. मात्र, काही दिवसांपासून पावसामध्ये आलेला विस्कळीतपणा कमी होईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply