Take a fresh look at your lifestyle.

Blog : ..कोरोना.. म्युकर.. मी आणि ‘ते’ तीन महिने..!

बऱ्याच दिवसापासून माझ्या आजारपणाविषयी सविस्तर लिहावं असा विचार होता. पण गेले तीन महिने औषधोपचार, प्रकृती अस्वास्थ्य आणि प्रचंड धावपळ यात लिहिणे शक्य झाले नाही. काल मला चौथ्यांदा डिस्चार्ज मिळाला, घरी आलो आता प्रकृती चांगली आहे, सुधारणा देखील होत आहे, त्याअंती गेले तीन महिन्यातील अनुभव मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न…

Advertisement

लेखक : सचिन ठुबे पाटील (ब्राह्मणी, ता. राहुरी, जि. अहमदनगर; मो. 9890011892)

Advertisement

तसे पाहता जीवनात अनेक गंभीर आणि जीवघेणे आजार आहेत. यातील अनेक आजार आपल्या सोयीचेदेखील झाले आहेत. मात्र नवख्या कोरोना आणि म्युकरने कसा धुमाकूळ घातला आणि जनता कशी यात गुरफटत गेली याचा मी अनुभव घेतला. 28 एप्रिल 2021 ला माझ्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरवातीला एकाचवेळी पाचजण पोसिटीव्ह आले. त्यांना वेगवेगळ्या कोविड सेंटरला दाखल करण्यात आलं. त्यामुळे माझी या सगळ्यामध्ये रुग्णांच्या मागे प्रचंड धावपळ सुरू होती. त्यात शेतीचा लोड, ग्रीनअप कंपनीचे कामकाजही सुरू होते. त्याच काळात ऑक्सिजन बेड, रेमडिसिव्हर आणि अन्य बाबीचा तुटवडा सुरू होता. नातेवाईक, गावकरी, मित्रपरिवार मदतीसाठी संपर्क करायचे. त्यांच्याही मदतीला मी कोणतीही कमतरता जाणवू देत नसत. हे सगळं सुरू असतानाच मी आणि पत्नी आजारी पडलो. घरात एक वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाची मुलगी आमच्यासोबत होते. त्यांना काही होऊ नये म्हणून आता काळजी वाटू लागली होती. थोडक्या औषधोपचारानंतर पत्नीला बरे वाटू लागले.

Advertisement

मी मात्र कोरोनात गुरफटत गेलो. टेस्ट केली, उपचार सुरू झाले, मला राहुरीतील कोविड सेंटरमध्ये दाखल केले. आता घरी फक्त पत्नी आणि दोन्ही मुले एकटीच राहिले होते. मी तेथे 3 दिवस राहिलो पण प्रकृती खालावत गेली. आमच्या जवळचे एक नातेवाईक डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे मला ऍडमिट केले गेले. त्यावेळी माझा स्कोअर 11 होता. आठ दिवस उपचार घेतले. बरे वाटू लागले असता मला पहिला डिस्चार्ज मिळाला, घरी आलो. एकदिवस बरे वाटले, पण दुसऱ्याच दिवशी पहाटे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि खरा जीवघेणा प्रवास येथूनच सुरू झाला. मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो, माझा चुलत भाऊ अर्जुन आणि माझे चुलते अनिल यांनी सकाळीच मला विळदला विखे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे पुन्हा स्कॅन केले तर स्कोअर 19 वर गेलेला. त्यात दुर्दैव म्हणजे विळदमध्ये बेड शिल्लक नव्हता. आता बेड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, मात्र इकडे माझी ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन 60 च्या खाली गेली. विळद मधील डॉक्टरांनी अर्ध्या तासात ऑक्सिजन लावा अन्यथा तुमचे पेशंट राहणार नाही, हे स्पष्टपणे माझ्यासमोर सोबतच्या अर्जुन आणि अनिल यांना सांगितले.

Advertisement

बेड मिळवण्यासाठी फोनाफोनी सुरू होती, राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांना निरोप दिला गेला. सोबत माझे मित्र डॉ. राजेंद्र बानकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. विजय मकासरे, आदिनाथ कराळे हे सर्व बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि विशेष म्हणजे सुदैवाने या सर्वांच्या प्रयत्नांना यश येत गेले. नामदार दादांनी नगर सिव्हिलमध्ये बेड उपलब्ध केला. बाकी सहकाऱ्यांनीदेखील युनिटी हॉस्पिटल, मॅक्सकेअर आणि विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी बेड उपलब्ध केले. अखेरीस डॉ. राजेंद्र बानकर यांच्या सल्ल्याने नगरमधील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले. गेल्याबरोबर ऑक्सिजन आणि आयसीयू हे ठरलेलेच होते. तेथील डॉक्टरांनी देखील पेशंटची प्रकृती गंभीर असून फक्त प्रयत्न आपल्या हातात असल्याचे सांगितले. यावेळी दुसऱ्या दिवशी आमदार निलेश लंके यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन मोठा आधार दिला. आता पुढील लढाई रेमडिसिव्हर उपलब्ध करण्याची होती. नामदार प्राजक्त तनपुरे, पिंपरी चिंचवड येथील माझे मित्र उद्योगपती ललित सेठ बाफना, राहुरीतील सहकारी भारतसेठ भुजाडी यांनी मला रेमडिसिव्हरची कमतरता भासू दिली नाही.

Advertisement

विघ्नहर्ताच्या आयसीयूमध्ये 7 दिवस होतो, तो खूप वाईट अनुभव होता. माझ्यासमोर रोज एक-दोन डेथबोडी पॅक केल्या जात. खूप वाईट वाटायचं पण मन कठोर करणे याशिवाय पर्याय नव्हता. या वाईट काळात माझी अर्जुन, किरण, विकी आणि दोन्ही मामा यांनी खूप काळजी घेतली. मी कोरोना पोसिटीव्ह असताना देखील अक्षरशः हाताने घास यांनी मला भरवले. कित्येकदा रात्ररात्र यांनी जागून काढली. माझी मावस बहीण भारती उंडे आणि श्रीकांत दाजी यांनी मला कायम मोटिव्हेट केले. माझ्या प्रकृतीत सुधारणा होत होती, आठव्या दिवशी मला आयसीयूच्या बाहेर शिफ्ट केले पण ऑक्सिजन कायम होता. डिस्चार्ज मिळण्याच्या दोन दिवस आधी मला दात आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. पेनकिलर इंजेक्शन घेतले की बरे वाटायचे, डॉक्टर म्हणाले गोळ्या दिल्या आहेत फरक वाटून जाईल. आणि अखेर मला 25 मे रोजी दुसऱ्यांदा हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. असे वाटले आता सर्व ठीक झाले, आता काही टेन्शन नाही. घरी आल्यानंतर एकदिवस राहिलो, दरम्यान मोबाईलवर म्युक्रमायक्रोसीसबद्दल वाचायला मिळत होते. घरी आल्यानंतर देखील माझी दातदुखी, डोकेदुःखी, झोप न येणे हे सर्व सुरुच होते. सोशल मीडियावर वाचल्याप्रमाणे मला ही सर्व लक्षणे म्युकरचीच वाटत होती. मी राहुरीतील माझे मित्र डॉ. महेश गव्हाणे यांना संपर्क केला. फोनवर सर्व ऐकून घेतल्यानंतर डॉ. गव्हाणे यांनी मला तातडीने राहुरीत बोलावून घेतले. डायग्नोसिससाठी नगरला पाठवनी केली.

Advertisement

त्याच रात्री मला म्युकरमायक्रोसिसची लागण झाल्याचे समजले. मला नगरमधील डॉ. गजानन काशीद यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिस्थितीचे आणि वस्तुस्थितीचे गांभीर्य डॉक्टरांनी अजिबात लपवून ठेवले नाही. म्युकर बुरशीचे मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झाले असून तातडीने ऑपरेशन करावे लागेल हे सांगितले. एव्हाना दुसरा पर्याय देखील हातात नव्हता. आता सगळं खर्च किती यावर येऊन थांबले होते. खर्चाचा आकडा ऐकल्यानंतर कुटुंबात सन्नाटा पसरला. कारण कुटुंबातील सर्वाचा कोरोना उपचार खर्च, माझा उपचार खर्च यात मोठी रक्कम खर्च झाली होती. माझे दोन्ही मामा, भाऊ अर्जुन, किरण, विकी आणखी एक दोघे हे सगळे काय करता येईल यासाठी प्रयत्न करू लागले. त्यात अधिक वेळ वाया घालवू नका, बुरशीचे इन्फेक्शन वाढत आहे, हे ही सांगितल्याने धाकधूक मोठी होती. म्युकर झाला की डोळे काढावे लागतात, कान-नाक ऑपरेशन करून बंद करतात हे वाचले होते. मला या सगल्याची मोठी भीती वाटत होती.

Advertisement

तर दुसरीकडे कोणतेही हॉस्पिटल कॅशलेस पॉलिसी स्वीकारायला तयार नव्हते. त्या काळात मी देखील बऱ्याच गोष्टींबाबत अनभिज्ञ होतो. पण कुटुंबाच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्ट जाणवत होता. याही वेळेस दैवी साथ मिळाली आणि अडचणींची शर्यत पार करून 28 मे रोजी माझे म्युकरचे पहिले ऑपरेशन झाले. काही दात, टाळूचा काही भाग, घशाचा काही भाग काढून टाकण्यात आला होता. जसे कोरोनावर रेमडिसिव्हर आहे तसे म्युकरवर अँफोटेरिसीन इंजेक्शन उपलब्ध करणे गरजेचे होते. एक इंजेक्शन सहा ते सात हजाराला मिळत होते असे डॉक्टरांनी मला किमान 80 ते 100 इंजेक्शन घ्यावे लागतील असे सांगितले. हा खर्च देखील मोठा होता. आता आपले कंबरडे पुन्हा मोडणार आणि हे संकट काही हटणार नाही याची जाणीव होऊ लागली. या काळात देखील नामदार प्राजक्त दादा तनपुरे पुन्हा मदतीसाठी धावून आले. त्यांनी शासकीय रुग्णालयातून दररोज इंजेक्शन मिळण्याबाबत व्यवस्था केली. मोठी आर्थिक मदत पाठवली आणि महाराष्ट शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची व्यवस्था कशी करता येईल याची व्यवस्था नोबेल हॉस्पिटलमध्ये केली. फक्त व्यवस्था केली नाही नामदार दादांचे स्विय सहाय्यक परदेशी साहेब सातत्याने फॉलोअप घेत होते.

Advertisement

मी नेहमी म्हणत असतो की “मित्र ही माझी संपत्ती आहे.” हा सर्व मित्र परिवार पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. हे सर्व असताना देखील विकी आणि किरण याना अँफोटेरिसीन इंजेक्शन मिळवण्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. माझा मेहुणा दत्ता वराळे आणि नगरमधील माझं हक्काचं घर म्हणजे भाऊसाहेब डावखर फॅमिली यांनी दोन महिने हॉस्पिटलमध्ये डबे पुरवले. या काळात अनेक मित्र, नातेवाईक, गावकरी, कुटुंबीय आणि हितचिंतक भेटायला येत. प्रत्येकजण जाताना उर्जा देऊन जात. राज्यभरातूनदेखील अनेकांचे विचारपूस करण्यासाठी फोन यायचे. मला बोलता येत नसे, मग आई बोलायची. मी मात्र खिन्न होऊन बघत बसायचो. दरम्यान माझे 76 अँफेटेरिसीन इंजेक्शन घेऊन झाले होते. पण मला दातदुखीचा त्रास सुरूच होता. मी थंडी-ताप याणे बेजार होतो. कोणताही फरक नव्हता तरीही आम्ही नोबेल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला आणि आम्ही 4 जुलै रोजी तिसऱ्यांदा घरी आलो.

Advertisement

त्रास सुरू असल्याने स्थानिक डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करायला सांगितले. आता अंगात त्राण उरला नव्हता. तरीही खात्री म्हणून आम्ही नाशिक, पुणे, औरंगाबाद येथिल काही डॉक्टरांचा सल्ला घेतला. सर्वांनी पुन्हा ऑपरेशन करावेच लागेल असे सांगितले. आता ही वेळ जगणे किंवा मरणे याचा मध्य काळ होता. पण दुसरे ऑपरेशन म्हणजे पुन्हा पाच-सात लाखाचा खर्च डोक्यावर होता आणि आता एक रुपयादेखील खर्च करणे अशक्य होते. पण मी आधी बोलल्याप्रमाणे आयुष्यात मित्रपरिवाराने मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठी पराकाष्टा केली. यात चित्रपट अभिनेते भाऊ कऱ्हाडे, ललित सेठ बाफना, राजेंद्र तेलोरे हे नावं प्रामुख्याने घ्यावे लागतील आणि त्यांना यश देखील मिळत गेले. आमची दुसऱ्या ऑपरेशनची धावपळ सुरू असतानाच माझा मित्र विकास तारडे आणि सोमनाथ हापसे भेटायला आले होते. त्यांनी प्रसिध्द कॅन्सर तज्ञ डॉ. ललित बनस्वाल (नाशिक) आणि औरंगाबादच्या डॉ. सीमित शाह यांना संपर्क केला. त्यावेळी डॉ. बनस्वाल यांनी परिस्थिती समजावून घेत खर्च करू नका, उद्या लोणी येथील PMT मध्ये या. आपण पुन्हा एखाद्या योजनेत बसवून ऑपरेशन करू असा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही डॉ. बनस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली PMT ला ऍडमिट झालो.

Advertisement

डॉ. सीमित शाह, डॉ. दीपक विखे यांनी माझे दुसऱ्यांदा म्युकरचे ऑपरेशन केले. या वेळेस मात्र ऑपरेशन मोठे होते. वरच्या बाजूचे सर्व दात, हिरड्या, टाळूच्या हाडासह उर्वरित भाग काढला गेला. PMT मध्ये मला डॉ. दीपक विखे यांनी मोठा धिर दिला. तेथे डॉक्टर लोक कोऑपरेटिव्ह होते. मात्र प्रचंड मुजोर नर्सिंग स्टाफ अनुभवायला मिळाला. तेथे कार्यरत असलेले स्नेही अस्वले आणि म्हस्के कुटुंबाची मोठी मदत झाली. अखेर परवा म्हणजे 28 जुलै रोजी मला चौथ्यांदा डिस्चार्ज मिळाला. चेकअप केले असता आता काहीही इन्फेक्शन नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण अंगात जीव मात्र राहिलेला नाही, प्रचंड थकवा आहे, बोलायला देखील मोठा त्रास होतो, जेवण बंद आहे, फक्त लिक्विड पेय नळीद्वारे सुरू आहे. या सगळ्यामुळे मात्र पुढील तीन महिने पूर्ण आराम करावा लागेल असे डॉक्टरांनी सक्तीने सांगितले आहे. शिवाय पथ्यदेखील खूप आहेत. दररोज जवळपास साडेतीन हजाराची औषधे खात आहे आणि त्या सर्व गोष्टींचे पालन पुढील तीन महिने करावेच लागेल हेही तितकेच खरे आहे.

Advertisement

जीवनात अनेक चढ-उतार येतातच नव्हे तर, असा बॅडपॅच हा प्रत्येकजण अनुभवत असतो. मला मात्र या आजारपणात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जशी चांगली माणसं सोबत होती, तशी वाईट अनुभव देणारेही (जवळचे) सोबत होते. गावपरिसरात अफवादेखील पसरवल्या गेल्या. “गेला-गेला, आहे-आहे” म्हणणारे आता उघडे पडले आहेत. (या लोकांबाबत आज बोलत नाही) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाची आणि माझीदेखील आयुष्याची सर्व घडी विस्कटली गेली. ग्रीनअपचे कामकाज तीन महिने पासून बंद आहे. जे फ्युचर प्रोजेक्ट होते हे सर्व विस्कळीत झाले आहेत. बँकिंग कोलमडले पण सिर सलामत तो पगडी पचास आणि आपला कणा आणि मनगट अजून भक्कम आहे हा विचार करून मी मनाची समजूत घालत असतो.

Advertisement

आज मला जर कुणी विचारले तर मी गर्वाने सांगेल की मला जीवनदान देणाऱ्या मित्रांच गाठोडं माझ्या जवळ आहे. ग्रामीण भागात भावकी उण्याची वाटेकरी समजली जाते, पण माझ्यासाठी भावकी ही अलौकिक शिदोरी ठरली आहे. स्नेही आणि नातेवाईक (निवडक आणि जवळचे) हे आजन्मीचे भांडवल आहेत. आणि ज्यांनाज्यांना आजवर अडचणीच्या काळात आपण मदत केली अस्यांनी आपल्यासाठी नवस बोलावेत, प्रार्थना कराव्यात ही आपल्या चांगुलपणाची पावती आहे असे मी समजतो. माझा जीव वाचावा यासाठी कुटुंबा व्यतिरिक्त प्रयत्न करणारे नामदार प्राजक्त तनपुरे, नामदार शंकरराव गडाख यांच्या कार्यालयातील सहाय्यक, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, चित्रपट अभिनेते भाऊ कऱ्हाडे, डॉ. उषाताई तनपुरे, महाराष्ट्र निधी फेडरेशनचे अध्यक्ष संदीप थोरात, महाऍग्रीचे चेअरमन विजय गोफने, कोल्हापूर येथील पत्रकार मित्र असिफ कुरणे, यवतमाळ येथील श्याम वाढई, नाशिकचे सतीश डोंगरे, विकास गामने, कुणाल संत, धुळ्याचे दीपेश पोद्दार, नगरचे भाऊ काळोखे, डॉ. राजेंद्र बानकर, गोविंद हापसे, देवळाली येथील आदिनाथ कराळे यांच्यासह शेकडो मित्रांचा, नातेवाईकांचा आणि सहकाऱ्यांचा मी आभारी राहील. विशेष म्हणजे फक्त माझेच नव्हे तर लहानभाऊ विकीच्या मित्रांनीदेखील खूप प्रयत्न केले. त्या सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत.

Advertisement

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि सहकार्याने सामाजिक जीवनात मी लवकरच ठणठणीत बरा होऊन सक्रिय होईल, असा विश्वास मला आहे. पुन्हा एकदा त्या सर्व ज्ञात अज्ञान हातांचा मी आभारी आहे, ज्यांनी आयुष्याच्या पानावर पडलेला पूर्णविराम हा स्वल्पविराम मध्ये परावर्तित केला ! लव्ह यू ऑल !!

Advertisement
Advertisement

Leave a Reply