Take a fresh look at your lifestyle.

पावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन

जळगाव : पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्विच बोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीज अपघात टाळण्यासाठी सदैव सावध व सतर्क राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. परंतु जाणतेअजाणतेपणी प्राणांतिक वीज अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजयंत्रणेच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक वस्तूपासून सावध राहणे आवश्यक आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्विच बोर्ड व वायर्स हाताळणे, घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे तसेच मुसळधार पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तूंच्या साह्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक गोष्टींमुळे वीज अपघातांचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये व जनावराच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्विचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्विच बोर्ड पासून बंद करावीत. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात दक्ष राहून विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत व त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत. विद्युत खांबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.

Advertisement

यासोबतच सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. सावधगिरी बाळगल्यास या दुर्घटना टाळता येतात. मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. मोठी झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा. शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. वीजयंत्रणेपासून धोका निर्माण झाल्याची शक्यता वाटल्यास किंवा शंका आल्यास नागरिकांनी ताबडतोब महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-१०२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply