Take a fresh look at your lifestyle.

भाजपच्या उलट्या ‘बोंबा’; काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी केलेत प्रश्नच..!

दिल्ली : कोरोना संकटकाळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशाच्या जीडीपीत सुद्धा ७.३ टक्के इतकी रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे. साहजिकच या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.या मुद्द्यावर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली होती. अर्थव्यवस्थेत अजूनही सुधारणा करता येऊ शकते, यासाठी सरकारने आता तरी विरोधक आणि अर्थतज्ञांचे ऐकावे, असे चिदंबरम म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज भाजपनेसुद्धा प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले, की कोरोना संकटाच्या काळातही काँग्रेस राजकारण करत आहे. सध्या कोरोनामुळे जगासाठीच हा संकटाचा काळ आहे. मात्र, तरी सुद्धा देशाची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. जगातील विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुद्धा 2021-22 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 12.5 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तरी सुद्धा यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संकटाच्या काळात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थाना जीडीपी कपातीच्या समस्येचा सामना करावा लागला नाही का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. फ्रांस, जर्मनी, इटली, युके यांसारख्या प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थाना सुद्धा कोरोनाने झटका दिला, या देशांना सुद्धा या संकटाचा सामना करावा लागला, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला. याआधीच्या युपीए सरकारच्या कारभारावर ठाकूर यांनी टीका केली. युपीए सरकारच्या काळात गरीबांसाठी किती बँक खाते उघडले गेले, मोदी सरकारने रोजगार हमी योजनेच्या निधीत वाढ केली आहे. मात्र, युपीए सरकारच्या काळात या योजनेसाठी किती निधी दिला जात होता, हे तरी माहित आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Advertisement

दरम्यान, याआधी चिदंबरम यांनी अर्थव्यवस्था आणि जीडीपी या मुद्द्यांवर केंद्र सरकारनवर टीका केली होती. तसेच अर्थव्यवस्थेत सुधार करण्यासाठी उपाय सांगितला होता. ते म्हणाले होते, की सरकारने आता तरी विरोधक आणि अर्थतज्ज्ञांचे ऐकावे. त्यानुसार कार्यवाही करावी. मात्र, त्याचा फायदा झाल्याचे दिसत नाही. कारण, आज भाजपने त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत युपीए सरकार असताना काय केले असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर काँँग्रेस काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुळात, काँग्रेस सरकारच्या काळात योग्य काम झाल्याचे न वाटल्याने देशाने बदलाची हाक देऊन भाजपला सत्ताधारी केले होते. त्यांच्याकडून काय झाले यावरच त्यांनी आता बोलणे अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तर देण्याच्या ऐवजी भाजपने आपल्या स्टाईलने प्रश्न विचारून प्रत्युत्तर दिलेले आहे. या दोन्ही पक्षांच्या गोंधळात देशातील आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांची वाट लागल्याने आता जनतेने कोणाकडे दाद मागायची हाच मुद्दा बाकी राहिला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply