Take a fresh look at your lifestyle.

BLOG : होय, होऊन जाऊ द्या की सहा महिन्याचाही लॉकडाऊन..

आयुक्त साहेब, आपणास शिरसाष्टांग दंडवत.. मान्य आहे की अहमदनगर शहरात करोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असेलही. पण करोना न होऊ देणे किंवा त्यातून बरे व्हायला इम्युनिटी पॉवर नावाची काहीतरी गोष्ट लागते असे आम्ही वैद्यकीय तज्ञांकडून ऐकले आहे. आणि ती इम्युनिटी पॉवर वाढवायची म्हणजे डाळी, फळे, मांस, मासे आणि भाजीपाला खावा लागतो. आणि तोच मिळाला नाही तर मग इम्युनिटी पॉवर काय अमेरिकन जनतेची वाढवत बसायची का?

Advertisement

अहो, रुग्ण वाढत आहेत. काळजी आवश्यक आहेच. पण महिनाभर किराणा, भाजीपाला बंद ठेवून, इम्युनिटी पॉवर कमी होऊन जर आम्हा नागरिकांना करोना बाधा झाली तर? आणि तशी झाल्यावर आमच्या मृत्यूची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घ्यावी की.. तसेच जर ही जबाबदारी घ्यायची नसेल तर, मग आमची इम्युनिटी पॉवर कमी झाल्यावर आमचा दवाखान्यात जाऊन होणारा वैद्यकीय खर्च तरी प्रशासनाने द्यावा की.. मागील वर्षी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या स्टाईलने चार तासात देश लॉकडाऊन करून दाखवला तसा प्रकार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्थानिक प्रशासनाने अजिबात करू नये. चूक ही चूकच असते.. मग भले ती माझ्यासारख्या एखाद्या सामान्य नागरिकांची असो की पंतप्रधान व मुख्यमंत्री आणि कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची..

Advertisement

आम्ही नागरिक बेजबाबदार आहोतही.. पण जगण्यासाठी आम्हाला खायला लागते की.. आणि त्यातून आम्हाला जगण्यासाठीची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व कलेक्टर साहेबांची नाही का? एकतर रुग्णालयात आमची लुट होतेय, लस मिळेना, औषधांचा काळाबाजार सुरू आहे म्हणून पंतप्रधान महाशयांनी किंवा मुख्यमंत्री यांच्यासह एकाही अधिकारी व मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिलाय का? तुम्हाला पगार मिळतात आणि कदाचित चांगले खायच्या संधीही.. पण व्यावसायिकांना त्यांच्या जागामालकाला भाडे द्यावे लागतात.. बँकेचे हफ्ते द्यावे लागतात.. आणि खायलाही आम्हाला लागतेच की..

Advertisement

नागरिक जगले पाहिजेत तर, काही पर्याय सांगतो आता मीच. भले हे १०० % योग्य नसतील. यातही त्रुटी असतील. पण मग त्रुटी दूर करून किंवा तुमचा वेगळा पर्याय देऊन करा की सोय..

Advertisement
  • दुधाप्रमाणे किराणा व भाजीपाला काही रोज लागत नाही. त्यासाठी नगर शहराचे काही ८-१० भाग करून, दिवसाआड किंवा २-३ दिवसांनी भागनिहाय भाजीपाला व किरणा विक्री करण्याचा नियम असावा. उदाहरण म्हणून पाहूया, आज जर सावेडी भाग चालू असेल तर इतर भागात असे दुकाने बंद असावेत. आणि सावेडी भाग बंद असताना इतर एखाद्या भागातील दुकाने खुली असावीत.
  • जान है तो जहान है.. असे आम्हाला मान्य आहे. पण मग जगायला खावेही लागते. आणि त्यासाठी कमवावे लागते. सरकारी कर्मचारी किंवा मोठ्या कंपन्यांतील नोकरदारांना लॉकडाऊन असो-नसो, पगार मिळतो. मग अशावेळी असंघटित क्षेत्रातील नागरिकांना प्रतिकुटुंब १० हजार महिना द्या की.
  • आणि महत्वाचे म्हणजे एकावेळी १००० नागरिक बाहेर पडणे योग्य की ५०? उत्तर ५० असेच असेल की.. मग करा की फ़क़्त अशीच काहीतरी सोय. यासाठी पर्याय म्हणून हेही पहा. सर्वच व्यावसायिक मंडळींना दुकाने खुली करण्याची परवानगी द्यावी. त्यांना ओळखपत्र आणि वेळेसह नमूद असलेला परवाना द्यावा. या सर्वांनी आपला माल थेट घरपोहोच देण्याची सोय करावी. मग किराणा-भाजीपाला लागला तरी घरपोहोच मिळावा आणि अगदी नट-बोल्ट लागले तरीही घरपोहोच देऊ शकणाऱ्या व्यावसायिकांनी यात पुढाकार घ्यावा.
  • नागरिकांना सुविधा तर नाहीच मिळत. पण पिळवणूक सहन करायलाही एक मर्यादा असते. आपण सगळे आदरणीय आहात. तुमच्या पद आणि ज्ञानाचा आदर आहे. पण, आमच्याही समस्या आहेत. आम्हाला जगायचे आहे. आणि सुस्थितीत जगण्यासाठी नाहीच थेट मदत करता आली तर, प्रशासनाने अडचणी वाढतील असेही करू नये.
  • लॉकडाऊन काळात सगळे काही मिळत असेल तरच जनता शांत राहू शकते. आताही मागील पंधरा दिवसात अनेक दुकाने आणि अस्थापना मागच्या दाराने चालू होत्याच की. त्यांच्यावर काहीअंशी कारवाई झाली. त्याचवेळी नियम पाळणारे सामान्य नागरिक उपाशीच राहिले की. किंवा नियम पाळणारे व्यावसायिकही अशावेळी भरडून निघालेच की. पण मग कारवाया करायला संधी निर्माण करण्यापेक्षा काहीतरी ठोस पर्याय काढा की.

बाकी, कडक लॉकडाऊन करून आपणही काही वाईट हेतूने असे काही करीत नाही. मान्य आहे की हेतू चांगला असेल. पण त्याचे परिणाम काही आमच्यावर चांगले होणार नाहीत. व्यावसायिक म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून आमच्या अडचणी सोडवायला केंद्र सरकार, राज्य शासन, जिल्हा प्रशासन किंवा महापालिका येणार नाही. आमची लढाई आम्हीच लढत आहोत. लढू आणि तुमच्यासह जिंकूही. फ़क़्त आमच्या ‘कॉमन’ असल्याचा त्रास आम्हाला होणार नाही याची काळजी ‘मायबापां’नी घ्यावी..

Advertisement

लेखक : सचिन मोहन चोभे (संपादक, www.krushirang.com)

Advertisement
Advertisement

Leave a Reply