Take a fresh look at your lifestyle.

बाजरी | पिक व्यवस्थापन सल्ला आणि मार्गदर्शन; वाचा महत्वाची माहिती

बाजरी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील हे एक महत्वाचे पिक आहे. आज आपण या लेखात या पिकाबद्दल अनेक महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत. कोरडवाहू भागातील या प्रमुख पिकाचे लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. यासाठी लागणारे मोठे मनुष्यबळ, खर्च आणि तुलनेने मिळणारे कमी भाव हे यामागचे खरे कारण आहे.

Advertisement

बाजरीसाठी रासायनिक वापरण्याचे महत्व : बाजरीला खरीप हंगामात मध्यम जमिनीसाठी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद आणि हलक्या जमिनीसाठी ५० किलो नत्र व २५ किलो  स्फुरद द्यावे. उन्हाळी हंगामात ९० किलो नत्र + ४५ किलो स्फुरद + ४० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. यासह इतर काही महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
 1. पिकातील विरळनीचे महत्व : हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखण्यासाठी पहिली विरळणी पेरणीनंतर १० दिवसांनी आणि दुसरी विरळणी २० दिवसांनी करून दोन रोपांतील अंतर १५ से.मी. ठेवावे.
 2. पिकातील आंतरमशागत : पेरणीनंतर सुरवातीचे ३० दिवस शेत तणविरहित ठेवावे. तणांचा बंदोबस्तकरण्यासाठी दोनवेळा कोळपण्या आणि गरजेनुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी.
 3. पिकासाठी तणनाशक : रासायनिक पध्दतीने तण नियंत्रणासाठी अॅट्रॉझिन तणनाशक २ ते ४ किलो प्रति हेक्टरी पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपुर्वी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मात्र, शक्यतो असे करणे टाळा. कारण, खुरपणी हा एक महत्वाचा संस्कार आहे.
 4. पाणी व्यवस्थापन : खरीप बाजरी पिकास २५ ते ३० हेक्टर सेमी आणि उन्हाळी बाजरीस ३५ ते ४०हेक्टर सेमी पाण्याची गरज असते. बाजरी ओलिताखाली घ्यावयाची असल्यास पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी) दुसरे पाणी पोटरीत असतांना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
 5. आंतरपीकपध्दती विषयी बाजरी पिकात आंतरपीकपध्दतीमध्ये मध्यम जमीनीत बाजरी + तुर आणि हलक्या जमीनीत बाजरी + मटकी २:१ याप्रमाणात आंतरपिके घ्या. दोन ओळीतील अंतर ३० से.मी. ठेवून (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी) तुरीची एक ओळ पेरावी.

बाजरीच्या काढणी आणि मळणी यामध्येही योग्य काळजी घ्यावी लागते. हातात कणीस दाबले असता त्यातून दाणे सुटणे तसेच दाताखाली दाणा चावल्यानंतर कट असा आवाज आल्यास पीक काढणीस योग्य आहे असे समजावे. ताटाची कणसे विळ्याने कापून गोळा करून वाळवून मळणी करावी.

Advertisement
महत्वाचे किड-रोग :
महत्वाचे रोग : केवडा (Downy mildew), करपा (Blast),अरगट (Ergot), तांबेरा (Rust),काणी (Smust); अरगट आणि काणी हे दोन्ही रोग मानवी आरोग्याच्यादृष्टीने खुप घातक आहेत.

 

Advertisement
 1. केवडा : रोपावस्थेत रोपे पिवळी पडून निस्तेज दिसतात. पानाच्या खालच्या बाजुला पांढुरकी पावडर म्हणजेच बुरशीचे बिजाणू दिसतात. वरच्या बाजूने ही पाने कालांतराने करपल्यासारखी दिसतात. प्रौढ अवस्थेत संपूर्ण कणीस दाणे न भरता फुलाच्या पाकळ्यासारखे दिसते. कणीस निघण्याऐवजी कणसावर लहान हिरवी पाने दिसतात. यालाच आपण झिपऱ्या किंवा बोवा (गोसावी) असेही म्हणतो.
 2. अरगट : कणसात दाणे भरण्याबरोबरच त्याठिकाणी साखरेच्या पाकासारखा गोडचिकट पांढरट / तांबूस रंगाचा द्रव स्त्रवतांना दिसतो.
 3. काणी : या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलो-यात असताना होतो. कणसातील रोग ग्रस्त दाण्या मधुन मधासारखा चिकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे काळसर स्कलेरोसिया तयार होतात. कणसात दाण्यांसोबतच काळपट दाणे दिसतात. हे फोडले असता त्यात तपकीरसारखी बुरशीच्या बीजाणूंची पावडर दिसून येते.
 4. करपा : पानांवर लंबवतृळाकर बारीक ते मोठेमोठे तपकिरी / काळपट रंगाचे ठिपके दिसतात. संपूर्ण पाने करपल्यासारखी दिसतात.
 5. तांबेरा : पानांवर वरच्या बाजुला नारंगी / तपकीरी रंगाच्या पुटकुळ्यासदृष्य पावडरदिसते. हाताने स्पर्श केल्यास ती सहज हाताला लागते.
केवडा या रोगाचे नियंत्रण
१) पेरणीपुर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झील ३५एस.डी (अॅप्रान) ६ ग्रॅम/किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
२) केवडा रोग शेतात दिसताच अशी रोगट झाडे उपटून जाळुन नष्ट करावीत.
३) केवडा रोगप्रतिकारक्षम वाणांचाच वापर करावा. (उदा. शांती) तसेच  केवडा रोग आलेल्या शेतात पुन्हा बाजरी त्याच ठिकाणी घेऊ नये.
 
अरगट या रोगाचे नियंत्रण
१) अरगट रोगग्रस्त शेतात बाजरीची कापणी झाल्यानंतर लगेचच खोल नांगरटकरावी.
२) नत्र खताची मात्रा योग्य शिफारशीत मात्रेतच दयावी. प्रमाणापेक्षा जास्त मात्रादिल्यास अरगट वाढतो.
३) पेरणी पुर्वी बियाण्यास २० %मिठाच्या दावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १०लिटर पाण्यात २ किलो मीठ विरधळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजुला काढून नष्ट करावे व तळाला असलेले निरोगी बियाणे स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळेस धुवावे त्यानंतर सावलीत वाळवून पेरणी करावी.
 
कणी रोगाचे नियंत्रण
रोगप्रतिकारक्षम वाणांचा वापर करणे हा आर्थिक दृष्ट्या सर्वात चांगला उपाय आहे.
 
करपा या रोगांचे नियंत्रण
१) करपा रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा.
२) करपा रोग दिसू लागताच शक्य असल्यास झायनेब ७५% डब्ल्यू. पी. बुरशी नाशकाची १० दिवसाच्या अंतराने १ ते २ फवारणी करावी.

 

Advertisement

अरगट रोग्रस्त दाणे खाल्याने होणारे अपाय : १) चक्कर येणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, झटके येणे, आणि काहींना कॅन्सर आदि; २) दुधाळ जनावरामध्ये दुध कमी होणे, सडांची वाढ खुंटणे, कोंबड्यामध्ये पीसेझडणे व पायांचे अपगंत्व दिसून येते.

Advertisement

बाजरी पिकाचे इतर महत्वाचे मुद्दे :

Advertisement
 1. केवडा या रोगाची साथीच्या स्वरुपात लागण झाल्यास ६० ते ७० टक्के पर्यंतउत्पादनात घट येते.
 2. मुळात बाजरी हे कमी पाण्याचे आणि महत्वाचे कोरडवाहू पीक आहे बुरशीनाशकांची फवारणी करणे तसे आर्थिक दृष्टया न परवडणारे आहे. शिवाय कोरडवाहू असल्यामुळे फवारणीसाठी गरज असेलच हे सांगता येत नाही. म्हणून बुरशीनाशकाची फवारणी करणे शक्य होत नाही.
 3. तांबेरा हा रोग बाजरीच्या पिकावर शक्यतोवर पक्वतेच्या अवस्थेत आढळून येतो.म्हणून याचा उत्पादन घटण्यावर गव्हाप्रमाणे तसा फारसा परिणाम होत नाही.
 4. दाणे पक्वतेच्या अवस्थेत वातावरणात खुप आर्द्रता व पाऊस झाल्यास कणसांवर पांढरी / फिकट गुलाबी रंगाची बुरशी दिसून येते. याला गेन मोल्ड असे म्हणतात. याव्यतिरिक्त बाजरीवर विशेष असे नुकसानकारक रोग दिसून येत नाहीत.

स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply