Take a fresh look at your lifestyle.

‘सावित्री’ची ‘धाव’ कमी पडली, मृत्यूने अखेर ‘सत्यवाना’ला गाठलेच.. वाचा हृदय हेलावून टाकणारी कहाणी.!

पुणे : लता करे हे नाव ऐकलंय.. हो, ही तीच सावित्री आहे, जिने आपल्या पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी पायाने कडाक्याच्या थंडीत बारामती शहरातील मॅरेथॉन पूर्ण केली होती. त्यात त्यांनी प्रथम क्रमांकही मिळवला होता.

Advertisement

त्यानंतर लता करे हे नाव मीडियातून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी मृत्यूच्या कराल दाढेतून आपल्या सत्यवानाचे प्राण परत आणले होते. मात्र, आता या माऊलीची धाव कायमची थांबली आहे. कारण, यमराजाने अखेर आपला डाव साधलाच. लता करे यांच्या धन्याला अखेर मृत्यूने गाठलेच. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु असताना त्यांच्या पतीचे निधन झालं आहे.

Advertisement

वर्ष होत 2013. ऐन थंडीचे दिवस.. बारामतीसारख्या सधन, संपन्न शहरात खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी लता करे यांचे पती भगवान करे मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्यावर तातडीने हृदयविकारावरील उपचार करण्याची गरज होती. पण, त्यासाठी पैसे कोठून आणणार? करे कुटुंबात अठरा विश्वे दारिद्र्य.

Advertisement

पतीच्या उपचारासाठी लता करे यांनी अनेकांचे उंबरे झिजवले. पण, सगळ्यांनीच हात वर केले. आता काय करायचे, पैसे कुठून आणायचे, पतीवर उपचार कसे करणार, अशा प्रश्नांचे काहूर त्या माऊलीच्या मनात उठले होते. त्याच वेळी त्यांची नजर या मॅरेथॉनच्या जाहिरातीवर पडली. पहिले बक्षीस मिळाले, तर पतीच्या उपचाराचा खर्च भागणार होता.

Advertisement

धावाधाव तर लता यांच्या पाचवीलाच पुजली होती. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये धावणे त्यांच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नव्हती. फक्त पैसे मिळविण्यासाठी त्या कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या. नुसत्या धावल्याच नाहीत, तर त्यांनी अपेक्षेप्रमाणे पहिले बक्षीसही मिळवले. पतीवर उपचार झाले. लता यांची ही कहाणी मीडियाने समोर आणल्यावर तर त्या एकदम प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.

Advertisement

सगळ एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे घडलं होतं. पुढे सलग तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेत त्यांनी ज्येष्ठांच्या श्रेणीत विजेतेपदाची ‘हॅटट्रीक’ साधली. पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपटदेखील काढण्यात आला. ‘लता भगवान करे,एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे लता करे यांनीच त्यात मुख्य भूमिका साकारली होती.

Advertisement

दरम्यान, गेल्या सात-आठ वर्षात लता करे अनेक मॅरेथॉनमध्ये धावल्या. बक्षीसेही मिळवली; पण कोरोनाच्या संकटातून पतीला बाहेर काढण्यात त्यांना अपयश आले. ज्या पतीसाठी इतकी वर्षे मेहनत केली, त्याचेच कोरोनामुळे निधन झाले. लता करे यांची धाव अखेर थांबली, ती कायमचीच..!

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply