Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य योद्धा : शेकडो रुग्णांना मदतीसाठी धावल्या भारती इंगावले; वाचा त्यांचे अनुभव

अहमदनगर : सध्या अनेकजणांनी करोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला आहे. प्रत्येकाच्या मदतीचा प्रयत्न आणि प्रकार भले वेगळा असेल. मात्र, माणुसकी जिवंत आहे आणि आपण सर्वजण या जागतिक संकटावर मात करताना एक असल्याचा संदेश देण्याचे काम असे आरोग्य योद्धे करीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातून अवघ्या महाराष्ट्रात रुग्णांना मदतीचा हात देणाऱ्या भारती संतोष इंगावले.

Advertisement

बातमीमध्ये येण्यासाठी किंवा राजकारणात पद मिळवण्याची लालसा न ठेवता काहीजण या संकटातही झोकून देऊन काम करीत आहेत. काहीजण आपल्या वितभर कामाचे हातभार सांगून राजकीय लाभासाठी आसुसले आहेत. मात्र, आपल्या मानसिक समाधानासाठी काम करून जनतेचे दु:ख कमी करण्याच्या भावनेने भारतीताई यांचे काम चालू आहे. लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध यामुळे भलेही त्यांच्या कामावर मर्यादा आलेल्या असतील. मात्र, यापूर्वीच केलेल्या सामाजिक कार्यामुळे राज्यभरात असलेल्या कॉंटॅक्ट लिस्टमधून योग्य व्यक्तीला संपर्क करून त्यांच्या मदतीने कार्य टेक्नोसॅव्ही पद्धतीनेही चालूच आहे. नगरमधील अनेकांनी त्यांच्या कामाबद्दल सांगितल्याने टीम कृषीरंगने त्यांच्या या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याही भागातील असेच काही खारीचा वाटा उचलणारे आरोग्य योद्धा असल्यास त्यांची माहिती आम्हाला krushirang@gmail.com या ईमेलने पाठवा. त्यांचे काम योग्य वाटल्यास आम्ही त्यालाही प्रसिद्धी देऊ.

Advertisement

भारतीताई यांनी आपल्या कामाबद्दल सांगतात की, समाजसेवेचं बाळकडू वडिलांकडून मिळाले. परंतु, स्वतः निर्णयक्षम होत नाही तोपर्यंत थोड्याफार प्रमाणात इतरांना सहकार्य करत होते. मागील पाच वर्षांपासून समाजसेवेत सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतला म्हणजे अगदी नावाच्या पुढे समाजसेविका लावावे असे काही नाही. फक्त माझ्या मनाला समाधान भेटते. कारण   मी इतरांना दुःखी पाहू शकत नाही. एकच विषयावर कधीच काम केले नाही. जिथे गरज पडेल आणि मला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत असते.

Advertisement

त्या सांगतात की, सोशल मिडिया किंवा मोबाईल हेही मदतीचे एक प्रभावी माध्यम आहे. त्याचा योग्य वापर करूनही आपण सामजिक काम करू शकतो. विधवा कामवालीला तिच्या तीन मुलांचा शालेय शिक्षण खर्च झेपत नव्हता. तिने माझ्या जवळ तिच्या भावना व्यक्त केल्या. मला जेवढी शक्य तेवढी मदत मी केली. परंतु, तेवढे पुरेसे नसल्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठीच्या खर्चासाठी आवाहन केले. तर राज्य भरातून मदतीसाठी हात पुढे आले. तिला मदत भेटली यातच खूप समाधान वाटले.

Advertisement

आतापर्यंत अनेक महिलांना वेगवेगळ्या व्यवसायाचे ट्रेनिंग देऊन त्यांना शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सबसिडी लोन मिळवून दिले. महिला सक्षमीकरण यामध्ये आणखीही काही करायचे आहे. पण आता फ़क़्त करोनातून मार्ग काढणे महत्वाचे आहे. ऊस तोड महिला कामगारांना   वेगवेगळ्या त्यांच्या आरोग्याचे महत्व आम्ही समजावून सांगत असतो. कोल्हापूर-सांगली येथील महापूर परिस्थितीतही साहित्य गोळा करून मदत पाठवली होती. मागिल वर्षी आलेल्या कोरोनाने तर खूप भयानक अनुभव आले आहेत. सुरूवातीला लॉकडाऊन पडले तेव्हा कामवालीच्या घरी धान्य नव्हते मी क्षणाचाही विचार न करता घरात जेवढे होते तेवढे धान्य तिला देऊन टाकले नंतर मलाही बाहेर विकत भेटेना मग मलाच इतर शेजाऱ्यांकडून घ्यावे लागले, असाही अनुभव त्या सांगतात.

Advertisement

आणखी एक अनुभव सांगताना भारतीताई म्हणाल्या की, एका ताईंचे मिस्टर ठाण्यामधे कोरोनामुळे वारले. त्यांना तिथे चौदा दिवस क्वारंटाईन केले गेले. नंतर टेस्ट रिपोर्ट पण निगेटिव आला. म्हणून घरी सोडण्यात आले. मग त्या अधिकृत परवाना घेऊन चिखली येथे त्यांच्या माहेरी आल्या आणि दुसऱ्या दिवशी फोन आला की तुम्ही पॉझिटिव आहात. गावापासून त्या तीन किमी लांब असणाऱ्या ठिकाणी मुलांना घेऊन राहत होत्या. तरी गावकऱ्यांनी त्यांना सर्वांना नगर येथे बुथ हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. लोकांमध्ये भीतीच तितकी होती म्हणा. या सर्व प्रकारात त्या महिला व त्यांच्या मुलांना खूप मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. तालुक्यात यामुळे चांगले राजकीय वातावरण तापले होते तरी या ताईंना व त्यांच्या मुलांना न्याय  मिळवून दिला. तेव्हापासून या कोरोना महामारीत जे शक्य होईल ती मदत करत आहे.

Advertisement

भारतीताई पुढे सांगतात की, तीन आठवड्यांपासून रोज शंभर फोन येतात. प्लाझ्मा पाहिजे.. बेड पाहिजे.. प्रत्येक पेशंट आपल्या घरातील आहे असे समजून त्यांना शक्य तेवढी मदत करत आहोत. दिवसरात्र फोन येत असतात. त्यांना मदत भेटल्यानंतरही ते मला संपर्क करतात. पेशंटला घरी सोडले आता सुखरूप आहे, असे समजल्यावर खूप समाधान वाटते. राज्यभरातील अनेकजण यासाठी आम्हाला मदत करतात. कधीकधी सकाळचा पहिला फोन असतो, ‘ताई तुम्ही एवढी मदत केलेले आपले पेशंट गेले ओ..’ आणि समोरून नातेवाईक फोनवर रडत असतात. अशावेळी त्यांना मानसिक आधार देत असते. हे सर्व करत असताना कुटुंबाची पण काळजी घ्यावी लागते. खूप तारेवरची कसरत होते. कधीकधी जेवायला रात्रीचे अकरा वाजतात. पण माझे पती समजून घेत आहेत. त्यांची साथ नसती तर मी हे करू शकले नसते.

Advertisement

राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या रुग्णांची हेळसांड हा खूप कॉमन मुद्दा बनला आहे. आपल्याकडे आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मागील दीड वर्षातही काहीच प्रयत्न झालेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण आणि तिथे योग्य सुविधा मिळण्याचा मुद्दा कोणालाही महत्वाचा वाटलेला नाही. आमच्यासारख्या व्यक्ती आणि संस्था यांच्या मदतीची गरज आहेच. पण आम्ही कितीही राज्यभरात मदतीचे जाळे उभे केले तरी पुरे पडू शकत नाहीत. त्यासाठी सरकार आणि सामाजिक व्यक्तींनी एकत्रितपणे आणखी काम करावे लागणार आहे. यात आरोग्य विभागाची अनास्था हा दुर्दैवी मुद्दा आहे. तर खासगीमध्येही येणारे बिल अनेकांच्या काळजाचा ठेका चुकवणारे आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांच्यात सेवा मिळणे यावर जिल्हा प्रशासनाने फोकस करण्याची आवश्यकता आहे. बाकी.. काळजी घ्या.. आणि करोना प्रोटोकॉलचे पालन करा.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply