Take a fresh look at your lifestyle.

नंदीग्रामचा रक्तरंजित इतिहास; वाचा ममता दीदींचा पराभव करणाऱ्या मतदारसंघाची थरारक कहाणी!

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपचा एकहाती पराभव केला. मात्र, त्या स्वतः निवडून येऊ शकल्या नाहीत. नंदीग्राम मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, त्यांचेच एके काळचे सहकारी शुभेंद्रू अधिकारी यांनी ममता दीदी यांना अस्मान दाखविले. एरवी नंदीग्राम मतदारसंघाकडे कोणाचे लक्ष गेले नसते, मात्र ममता दीदी स्वतः या मतदारसंघातून लढत असल्याने सगळ्यांचे लक्ष या लढतीकडे लागले होते. त्यात ममता दीदींचा पराभव झाल्याने हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. यानिमित्ताने या मतदार संघाचा धांडोळा घेतला असता, एक वेगळाच इतिहास समोर आला. काय आहे हा इतिहास चला तर पाहू या..

Advertisement

नंदीग्रामचा रक्तरंजित इतिहास!
नंदिग्राममध्ये 2007मध्ये सर्वात उग्र आंदोलन झालं होतं. जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन करुन, ममता बॅनर्जींनी डाव्यांचं सरकार हद्दपार करुन त्या सत्तेत आल्या. 2007 मध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्त्वातील तत्कालिन सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु केली होती. बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने ‘सलीम ग्रुप’ला ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ (Special Economic zone) म्हणून नंदिग्राममध्ये एक केमिकल फॅक्टरी (chemical factory) उभी करण्यास मान्यता दिली. याविरोधात बंगालमध्ये रान उठलं होतं.

Advertisement

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. ‘तृणमूल’ने विरोधी पक्षांची मोट बांधून सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्त्व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी केलं होतं, तर या आंदोलनाचे नायक होते, शुभेंदू अधिकारी. होय, हे तेच शुभेन्दू अधिकारी आहेत, ज्यांनी ममता यांचा पराभव केला.

Advertisement

14 जणांची हत्या
असो.. तर 2007 मधील या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. त्यात 14 जणांचा जीव गेला होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन औद्योगिकीकरणाच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. हल्दियाचे तत्कालीन खासदार लक्ष्मण सेठ यांच्या नेतृत्वातील ‘हल्दिया डेवलपमेंट अथॉरिटी’ने (Haldiya Development Authority) भूमी अधिग्रहणासाठी नोटीस जारी केल्यानंतर तर परिस्थिती आणखी चिघळली. त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. 14 मार्च 2007 रोजी या संघर्षादरम्यान जवळपास 14 जणांची हत्या झाली होती.

Advertisement

‘मां, माटी, मानुष..’
नंदिग्राममध्ये झालेल्या आंदोलनानंतर लगेचच डाव्यांची सत्ता उलथवण्यात ममता बॅनर्जींना यश आलं. ममतांच्या नेतृत्त्वातील या आंदोलनात बंगालमधील लेखक, कलाकार, कवी, शिक्षकांसह सर्वसामान्य जनता सहभागी झाली होती. त्यावेळी सर्वांनी जमीन अधिग्रहणाला कडाडून विरोध केला होता. या आंदोलनाने ममता बॅनर्जी यांना सर्वसामान्यांमध्ये नवी ओळख निर्माण करुन दिली. त्याचा परिणाम म्हणून 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, तब्बल 34 वर्ष सत्तेत असलेल्या डाव्यांना पायउतार व्हावं लागलं. ममतांनी घातलेली ‘मां, माटी, मानुष’ची साद बंगालवासियांनी ऐकली आणि त्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या दिल्या.

Advertisement

नंदीग्राम : बंगालच्या राजकारणाचे केंद्रबिंदू
बंगालच्या राजकारणाचे केंद्रबिंदू कायम नंदीग्राम राहिले आहे. ममता यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या शुभेन्दू अधिकारी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ममता यांची साथ सोडून, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. नंदीग्राम हा शुभेंद्रू यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या एक दशकापासून नंदीग्रामची जागा कायमच तृणमूलकडे राहिली आहे. परंतु, शुभेंद्रू यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हा गडही भाजपकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनीच नंदीग्रामच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

नंदीग्राममधील 40 ते 45 जागांवर शुभेंद्रू यांचा प्रभाव आहे. त्यांचा हा प्रभाव कमी करण्यासाठी, तसेच ‘टीएमसी’चे बालेकिल्ले मजबूत करण्यासाठीच ममता दीदींनी नंदीग्रामची निवड केल्याचं बोललं जात. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आले होते. सुरुवातीला तर त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांचा पराभव झाल्याचे समोर आले. मात्र, अधिकारी यांनी विजय मिळवला असला, तरी त्यांच्या एकहाती वर्चस्वाला येथे धक्का बसला आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply