Take a fresh look at your lifestyle.

बाजरी | ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम आणि पिक व्यवस्थापन सल्ला

बाजरी पिकाच्या शिफारस केल्या गेलेल्या एकाच संकरित वाणाचे बिजोत्पादन एकाच गावात राबविल्यास त्यास ग्रामबिजोत्पादन असे म्हणतात. याकरिता गावातील सर्व बाजरी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे विचार करून एकाच संकरित वाणाच्या नर व मादी वाणांचे पायाभूत बियाणे विद्यापीठाकडून मिळवावे व बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून बिजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी करावी. वेळोवेळी प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन घेऊन शुध्द बियाणे तयार करता येऊ शकते. त्यामळे शेतकऱ्यांना शुध्द बियाणे तर मिळतेच शिवाय बिजोत्पादनात साधारण बाजरी उत्पादनापेक्षा जास्त निव्वळ नफा मिळतो.

Advertisement

बाजरीच्या लागवडीसाठीचे इतर महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • बाजरीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू हा ६.२ ते ८ असावा. हलक्या जमिनीत बाजरीचे पिक घेतल्यास सरी वरंबा पद्धत वापरावी.
  • बाजरी या पिकास उष्ण व कोरडे हवामान (१० ते ४५ से.ग्रे.) मानवते व हे पिक पाण्याचा ताण सहन करू शकते.
  • जमिनीचा १५ से.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यांनतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे व कोडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणी हेक्टरी ५ टन शेणखत शेतात पसरून टाकावे.
  • खरीप हंगामात बाजरीची पेरणी १५ जून ते १५ जुलै (२६ ते २८ व्या हवामान आठवड्यांपर्यंत ) दरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. उन्हाळी हंगामात बाजरी पिकाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीनंतर करू नये. कारण पिक पुढील उष्ण हवामानात सापडण्याची शक्यता असल्याने कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते.

बीजप्रक्रिया आणि इतर महत्वाची माहिती अशी :

Advertisement
  •  बाजरीच्या पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो चांगले निरोगी बियाणे वापरावे.
  • बीजप्रक्रिया करताना २० % मिठाच्या द्रावणाची बीजप्रकिया अरगट रोगासाठी करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. त्यातील पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा.
  • यामध्ये २५ ग्रॅम अॅझोस्पिरीलम प्रति किलो बियाण्यांस चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खतात बचत होते. तसेच उत्पादनात जवळपास १० टक्के वाढ होते. पेरणीपुर्वी ६ ग्रॅम मेटेलॉक्झिल (अॅप्रॉन) या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया गोसावी (केवडा) या रोगासाठी करावी.
  • पेरणीसाठी बाजरी पिकाचे ओळीतील अंतर ४५ सेमी व दोन रोपातील अंतर १५सेमी ठेवल्यास हेक्टरी सुमारे १.५ लाख रोपांची संख्या ठेवता येते. नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असेल तेथे 30 x १० सेमी अंतरावर पेरणी करावी.
  • बाजरीच्या पेरणीच्या पध्दती : १) थेंब थेंब संचय पध्दत (सरी वरंबा पध्दत) २) सपाट वाफे पध्दत
  • थेंब थेंब संचय पद्धत : या पद्धतीत पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब पिकासाठी योग्य तऱ्हेने उपयोग करून घेता येतो. हलक्या ते मध्यम उताराच्या जमिनीवर मृगाचा पाऊस पडण्यापूर्वी राहुरी बाजरी सरी व पेरणीच्या पाभरीने ४ ते ६ इंच (१० ते १५ सेमी ) खोलीच्या ४५ सेमी अंतरावर उताराच्या विरुद्ध दिशेने साऱ्या तयार केल्यास पावसाच्या थेंब न थेंब संचय करता येतो. वापसा आल्याबरोबर पूर्वी तयार केलेल्या साऱ्यांमध्ये पेरणी करावी, या पद्धतीमुळे सरासरी २७ टक्के अधिक उत्पादन व चाऱ्याचे २१ टक्के अधिक उत्पादन आणि पिके पक्वतेची कालावधी १० ते १२ दिवस लवकर येतो.

स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply