Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अवघा देश ऑक्सिजनवर; पहा नेमकी कुठे झालीय भारताची चूक..!

नाशिक घटनेची बातमी वाचलीय ना? त्या दुर्घटनेचेही आता राजकारण जोरात आहे.. असणारच की.. कारण, कशाचेही राजकारण करणे हा आपला सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे. सध्या अवघा देश ऑक्सिजनवर आहे. करोना लस रेमिडीसिवीर औषध, ऑक्सिजन कमतरता आणि त्यामुळे होणारे रुग्णांचे मूत्यू याच चक्रव्युहात सध्या अवघा भारत देश गुरफटला आहे. तिकडे परदेशात काय चाललेय यापेक्षाही आपल्याकडे नेमके काय चाललेय हे आपल्याला डोळे उघडून पाहावे लागणार आहे. कारण, त्यामुळे अवघा देश ऑक्सिजनवर आहे..!

Advertisement

लेखक : सचिन मोहन चोभे (संपादक, कृषीरंग)

Advertisement

आठवड्याभरातील बातम्यांवर फोकस करा. मग काही उत्तरे अपोआप मिळतील. ऑक्सिजन एक्स्प्रेस आठवतेय ना? चांगला उपक्रम आहे हा. सध्या देशाला त्याची गरज आहेच. पण त्यालाही एक गोंडस नाव देण्याचे आपण टाळले का? नाही ना? ऑक्सिजन एक्स्प्रेसने किती ऑक्सिजन मिळणार याचा विसर पाडण्यासाठी असले नाव देऊन काहीतरी भन्नाट केले जात असल्याचे पटवून देण्याची आणि पटवून घेण्याची सवय आपल्या सर्वांना लागली आहे. दीड वर्षे झाले हा करोना नावाचा विषाणू येऊन. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर ट्विटर पोस्ट लिहिली. भाजप आणि त्यांच्या अंध कार्यकर्त्यांनी त्याची टर उडवली. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम झाला. मग, मध्यप्रदेश राज्य ताब्यात घेण्याचा खेळ रंगला. आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी हे सगळे पाहिले. आपण शांत राहिलो. कारण, आपण सगळे शोशिक होतो. आणि आहोत..!

Advertisement

मग, स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे, या मुद्द्याला बासनात गुंडाळून देशभरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय दणक्यात जाहीर झाला. त्यालाही रात्रीच्या 12 तासांच्या जनता कर्फ्यूची जोड दिली गेली. बल्ब बंद करून मेणबत्ती पेटाव कार्यक्रम झाला. टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा जगप्रसिद्ध कार्यक्रम झाला. दरम्यान, करोनाच्या अपयशाने ट्रम्प यांचा तिकडे अमेरिकेने ‘कार्यक्रम’ केला. जो बिडेन राष्ट्राध्यक्ष झाले. ब्राझील नावाच्या देशात मंत्री व संरक्षण अधिकाऱ्यांनी राजीमाने देऊन आपल्याच नेत्याच्या आणि राष्ट्रप्रमुखाच्या विरोधात निषेध व्यक्त झाला. तिकडे असे चालू असताना आपण काय करीत होतो? तर, गुजरातला मोठ्ठं क्रिकेट स्टेडियम बांधत होतो. एकमेकांवर चिखलफेक करीत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर प्रत्युत्तर देत नव्हते. सल्ले देणाऱ्या राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील राज्यात ठोस काहीही होत नव्हते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह येऊन मस्त गरम पाणी पिण्याचे सल्ले देत होते.

Advertisement

त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्य सरकार कसे टिकेल यावर फोकस करून होते. गृहमंत्री अमित शाह आणखी एखादे राज्य भाजपच्या खिशात टाकायची संधी शोधत होते. भारत-चीन तणाव आणि पाकिस्तान यांच्यासह हिंदू-मुस्लीम या मुद्द्यावर न्यूज अँकर घसा खरडून ओरडत होते. ‘अनलॉक 1’ करून देश आता कसा करोनामुक्त होणार याचे गोडवे भाजपचे कार्यकर्ते आणि नेते गात होते. राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर आदरणीय मोदीजी थेट ‘व्हॅक्सिन गुरू’ बनले होते. १२८ देशांना लस पुरवठा करून मोदीजी टीव्हीवर विश्व गुरू बनत होते. त्याचवेळी आपण करोना योद्धे म्हणून गावातल्या सरपंचाचाही गौरव करीत होतो. बिहार आणि इतर राज्यात दणक्यात निवडणुका झाल्या. आपल्याकडे ग्रामपंचायत निवडणुकीत मस्त पैसा-दारू रिचवली गेली. तिकडे देशभरात आणखी काही राज्ये ताब्यात घ्यायला जे. पी. नड्डा यांचा भाजप डोके लावत होता. इकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडायला म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे उंबरे देवेंद्र फडणवीस झीझावत होते.

Advertisement

त्याचवेळी महाविकास आघाडीचे शिलेदार आपणच कसे राज्याला करोनामुक्त करू शकतो, याची वल्गना करीत होते. रुग्ण त्यावेळीही मृत्यू पावत होते. आकडा कमीच होता. दरम्यान, वर्धा येथील रुग्णालय दुर्घटना घडली आणि आपण विसरलो. राज्यात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पंढरपूर पोटनिवडणूक होतीच. त्यात माजी वनमंत्री संजय राठोड आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही प्रकरण होतेच की तोंडी लावायला. त्यावेळीही आपण नव्या घोषणा आणि नवीन प्रोजेक्ट यांची नावे वाचत, पाहत आणि ऐकत होतो. आताही ‘ब्रेक द चेन’ ऐकतोय. पण त्या सगळ्या योजनांची फलनिष्पत्ती काय? मंदिर-मस्जिद मुद्द्याचे नेमके फायदे काय, यावर आपण कधीतरी सरकारला जाब विचारलाय? नाही ना..!

Advertisement

एखाद्याने विचारला तर त्याला काँग्रेसी, डावा, उजवा, भाजपाई म्हणून आपणच ट्रोल करीत होतो. आताही तेच करतोय. म्हणूनच नाशिक दुर्घटनेला महापालिकेत सत्तेत असलेला भाजप जबाबदार की राज्यातील सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी का काँग्रेस यावरच आपला काथ्याकुट चालू आहे. अरे, देशाला चांगल्या शाळा, आरोग्य केंद्र, क्रीडा संकुले, संशोधन संस्था, सामाजिक संस्था यांची गरज आहे. त्याकडे पाहायला आपल्याला अजिबात वेळ नव्हता. आपण मंदिर-मस्जिद बांधण्यात मश्गुल होतो आणि आताही आहोत. अजूनही आपले धार्मिक उत्सव व लग्नसमारंभ थाटात होतातच ना? सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बोगस काम करताना आपण सगळेच शांत होतो. आताही या करोना संकटात आपण गावोगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र व्यवस्थित करायला प्राधान्य दिले आहे का? नाहीच ना..!

Advertisement

मग नाशिक दुर्घटनेला किंवा अवघा देश प्राणवायूसाठी टाहो फोडत असतानाही आपण गलिच्छ राजकारणाला खतपाणी घालणार आहोत का? लोकशाहीत जशी जनता असते तसेच राज्यकर्ते आपल्याला भेटतात. त्यामुळे सध्याचे राजकारणी, पत्रकार आणि सरकारी अधिकारी हे आपल्यातले आहेत. आणि आपण सगळे कोडगे असल्याने तेही कोडगे आहेत. आपल्याला अगोदर कोडगेपणा सोडवा लागेल. जात, धर्म आणि प्रांत हा घोळ मिटवावा लागेल. एक देश म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्द्यांवर सोशल मिडीयामध्ये व्यक्त व्हावे लागेल. कोडग्या राजकारण्यांना जाब विचारावा लागेल. चांगल्या सेवा आणि सुविधा सरकारने देण्यासाठी आग्रह धरावा लागेल. मगच आपण ऑक्सिजनवर असणार नाही.. नाहीतर..

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply