आणि ‘त्या’ चिमुरडीला मिळाली दुसऱ्याच दिवशी सायकल; अकोले-संगमनेरच्या तरुणांनी केली कुटुंबीयांनाही मदत
अहमदनगर :
एखाद्याच्या संकटामुळे आपल्याही पोटात तुटते. तसे जर आपल्याही पोटात तुटत नसेल तर आपली माणुसकी नावाची भावना शून्य आहे, याचेच हे द्योतक. मात्र, जगात कितीही बदल झाला तरी मदत आणि दान करण्याची प्रवृत्ती काही कमी झालेली नाही. धर्म आणि जात यांना छेद देऊन मदतीला धावणारे आहेत, आणि म्हणून माणुसकीही जिवंत आहे. त्याचाच प्रत्यय अकोले व संगमनेर येथील तरुणांनी व जनसेवा फौंडेशन (अकोले) यांनी दिला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पर्सनल असिस्टंट अभिजित बेंद्रे यांनी त्या चिमुरडीला सायकल भेट दिली आहे.
कोंभाळणे या अकोले तालुक्यातील गावाची ही दुर्दैवी घटना आहे. रामदास गावंडे यांच्या घराला आग लागल्याने त्याचे सर्व साहित्य, झोपडी आणि सायकल खाक झाले. मुलगी सुप्रिया गावंडे (इयत्ता पहिली, वय ६ वर्षे) हिची सायकलही त्यात खाक झाली. तिचा फोटो सोशल मिडीयामध्ये जोरदारपणे व्हायरल होत आहे. अशावेळी मदतीची गरज ओळखून बेंद्रे हे स्वतः आजारी असतानाही त्यांनी आपले मित्र आणि सहकारी यांच्यासह ही मदत केली आहे. सुप्रियाला सायकल नेऊन देणाऱ्या रोहित बर्वे यांनी म्हटले आहे की, अभिजित बेंद्रे आजारी असल्याने आम्ही त्यांची सायकल पोहोच केली आहे. या कुटुंबाला प्रदीप नाईकवाडी यांनी जीवनावश्यक वस्तू व किराणा, तर जनसेवा फौंडेशन (अकोले) यांनी कपडे आणि भांडी या वस्तू दिलेल्या आहेत.

दरम्यान, अकोले या आदिवासी तालुक्यातील या दुर्दैवी घटनेत एका कुटुंबाचे झोपडे खाक झाले. अवघे कुटुंब उघड्यावर पडले. त्याचे फोटो ट्विटरवरही शेअर झाले. अनेकांनी आपली भावना त्यावर व्यक्त केली. मदतीच्या गरजेची भावनाही मांडली. त्यातही एका चिमुरडीची जाळून खाक झालेली सायकल आणि तो त्या तिच्या आवडत्या सायकलकडे पाहतानाचे फोटो अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारे ठरले.
हाच पोटात तुटण्याची भावना असलेला फोटो पाहून अनेकांनी या गरीब कुटुंबाला मदत केली. जळलेल्या सायकलकडे मोठ्या प्रेमाने पाहणाऱ्या चिमुरडीला मग संगमनेर आणि अकोल्यातील तरुण मित्रांनी सायकल गिफ्ट केली. सध्या अनेकांनी आपल्याच राजकीय पक्षाने किंवा संस्थेने ही मदत केल्याचे भासवत याचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, त्या चिमुरडीला मदत केली आहे ती, स्थानिक तरुणांनी. रोहित बर्वे यांनी अभिजित बेंद्रे यांची सायकल नेऊन दिली आहे. त्याचेच फोटो आपले असल्याचे भासवून हे फोटो शेअर करून आपला नेता किंवा राजकीय पक्ष आणि संघटना मोठी ‘दानशूर’ असल्याचे दावे केले जात आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी आणि गरिबांचे नेते म्हणून मदतीला तत्पर असणाऱ्या मंत्री बच्चू कडू यांनीही या कुटुंबियांना तातडीने लागेल ती मदत देण्याचे ट्विटरवरून जाहीर केले आहे. ‘काल सोशल मीडियावर नगर जिल्ह्यातील या मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो दिसला. आगीमुळे घरातील साहित्यासोबत या मुलाची सायकलही जळून खाक झाली होती. प्रहारतर्फे त्या कुटुंबांना तात्पुरती मदत आणि त्या चिमुकल्याला नवीन सायकल दिली. या कुटुंबांना उभे करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी मदत करणार’, असे मंत्री कडू यांनी म्हटले आहे. सोशल मिडीयामध्ये सक्रीय असलेल्या आणि राजकीय-सामाजिक भूमिका घेणाऱ्या वैभव कोकाट यांनी म्हटले आहे की, या कुटुंबाला मदतीचा ओघ वाढलेला आहे. ४ सायकल मिळाल्या आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते
- ‘फोन-पे’, ‘गुगल-पे’द्वारे पैसे पाठवण्याच्या नियमात झालाय बदल; पहा कशावर होणार आहे परिणाम..!
- राहुल गांधी यांनी जाहीर केला महत्वाचा निर्णय; त्यामुळे बंगालमध्ये कॅन्सल केल्या सर्व सभा..!