म्हणून धोनीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केले असावे मुंडन; पहा काय म्हटलेय बिस्वाल यांनी
मुंबई :
भारताच्या दुसऱ्या वर्ल्डकप विजयाला आता १० वर्षे पूर्ण झाली असून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गौतम गंभीर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चांगल्या फलंदाजीच्या बदल्यात भारताने ६ गडी राखून सामना जिंकला होता. मात्र विश्वचषक विजयानंतर धोनीने मुंडन केले होते. त्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान संघाचे व्यवस्थापक रणजीब बिस्वाल यांनी विजयानंतर धोनीने केलेल्या मुंडनबद्दल माहिती दिली आहे. बिस्वाल यांनी एएनआयला सांगितले, ‘विजयानंतर खेळाडूंनी पहाटे साडेचार वाजेपर्यंत जल्लोष केला. सकाळी सर्वांनी जेव्हा धोनीने मुंडन केलेले पाहिले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. हा सर्वात धक्कादायक क्षण होता. अंतिम सामन्यानंतर सकाळी आम्ही धोनीला या रूपात बघू याची कोणालाही कल्पना नव्हती. रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्वांनी ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन केले, त्यानंतर आम्ही सर्वजण आमच्या रूममध्ये गेलो होतो. जे आम्ही सकाळी पाहिले ते आश्चर्यचकित करणारे होते.
बिस्वाल पुढे म्हणाले की, जल्लोष जोपर्यंत चालू होता तोपर्यंत धोनी आमच्या बरोबर होता. नंतर तो त्याच्या खोलीत गेला आणि मुंडन केले. त्याने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. धोनी आपल्या भावना स्वताजवळच ठेवतो आणि त्या जास्त व्यक्त करत नाही. मला वाटते धोनीने एखादा नवस केलेला असावा. खरे कारण काय होते ते आम्हाला माहिती नाही. पण रांची येथे त्याच्या घराजवळील मंदिराला त्याने नवस मागितला होता. तेव्हा त्याला पहाटेच्या दरम्यान मुंडन करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.
संपादन : अपेक्षा दाणी
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..