Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : गोठा बांधकामाचे ‘हे’ मुद्दे नक्कीच वाचा; नफा वाढवायला होईल याचा उपयोग

गोठा बांधकामाची माहिती देणाऱ्या या दुसऱ्या भागात आपण इतरही काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत. गोठा हवेशीर, माफक खर्चात आणि आपल्या गरजेनुसार बांधण्याचे हे काही मुद्दे आहेत. फ़क़्त याच मुद्द्यांवर अवलंबून न राहता आपणही अभ्यास करून आणि अनुभवी माणसांच्या सल्ल्यानुसार इतर काही मुद्दे लक्षात घेऊन गोठ्याचे बांधकाम करावे.

Advertisement

गोठा बांधकामात पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात :

Advertisement
  • गोठा बांधकामासाठी ‘हेच पाहिजे आणि ते नको’ असा काहीही अट्टाहास अजिबात करू नये. स्थानिक भागात उपलब्ध चांगल्या पर्यायांचा वापर करून कमी खर्चात गोठा उभारण्याचा प्रयत्न करावा.
  • अनेकांना वाटते की, उगीचच शेळ्यांना मातीत बसायला लावण्यापेक्षा आपण त्यांना मस्त काँक्रीटच्या मऊशार जागेवर बसण्याची सोय करू. मात्र, शास्त्रीयदृष्ट्या विचार केल्यास हे चूक आहे. शेळी हा मातीत बसणारा प्राणी आहे. मातीत बसल्याने तिला जमिनीची उब मिळते आणि सर्दी होत नाही.
  • मुरुमाची भर टाकून वरती भाजलेल्या विटांचा वापर केल्यास उत्तम. कारण, जमिनीतून शेळ्यांना हिवाळ्यात उष्णता, तर उन्हाळ्यात योग्य अशा पद्धतीचा थंडावा मिळतो.
  • गोठ्यात टाकलेल्या मुरुमाचा ४-५ इंच ठार काढून टाकून नव्याने भर टाका. अशी भर टाकताना त्याद्वारे गोचीड व पिसवा यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात चुना व १० टक्के फॉलीडॉल पावडर टाकावी.
  • आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करूनही गोठ्याचे बांधकाम करणे शक्य आहे. त्यासाठी सुबाभूळ, निलगिरी, निंब (कडूनिंब), बाभूळ आदींच्या बल्ल्या आणि बांबू किंवा इतर लाकडांचा वापरही करू शकता. तसेच उसाचे पाचट किंवा पानकंजाळ यांचा वापर करूनही आपण छत उभारू शकतो.
  • आपली खर्च करण्याची क्षमता जास्त असेल तर मग असे छत उभारणी करण्यासाठी लोखंडी पाईप, सिमेंटचे खांब आणि स्टील / सिमेंट यांचे पत्रेही वापरू शकतो.
  • आपल्या भागात लांडगा व इतर जंगली प्राण्यांचा धोका असल्यास त्यानुसार गोठ्याच्या भोवती जाळीचे कुंपण करावे. शेळ्या बाहेर फिरण्यासाठी जी जागा आहे तिथे ४-६ फुट उंचीची जीआय तारेचे कुंपण करून घ्यावे.
  • गोठ्यामध्ये दिवसा व रात्रीही कोणीतरी एक मनुष्य असण्याची काळजी घ्यावी. रात्री-अपरात्री शेळ्यांना काहीही संकट आले तर अशावेळी ही व्यक्ती मदतीला तत्काळ जाऊ शकते.
  • शेळ्यांच्या गोठ्यामध्ये बोकड, करडे, खटया शेळ्या आणि गाभण शेळ्या यांना स्वतंत्र ठेवण्यासाठीची सोय करणे शक्य असल्यास तसे करून घ्यावे.
  • गोठ्याच्या बाहेरील जागेत सावलीसाठी झाडे असल्यास उन्हाळ्यात त्यामुळे शेळ्यांना शीतल गारवा मिळतो.

पुढील भागात आपण गोठ्याच्या बांधकामाचे आणखी काही मुद्देही पाहणार आहोत.

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply