Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : गोठा बांधताना ‘ही’ घ्या काळजी; नाहीतर होऊ शकते ‘हे’ नुकसान

शेळीपालन आपल्याला करायचे आहे आणि त्यातून आपल्यालाच पैसे कमवायचे आहेत. त्याचवेळी यामध्ये जर दुर्दैवाने तोटा आलाच तर तोही आपल्यालाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याकडे प्रॅक्टिकल दृष्टीकेनातून पहा. उगीचच कोणीतरी काहीतरी झंकी-पंकी गोठा बनवण्याचा सल्ला देत असेल तर त्याची शक्यतो गाठ घेणे टाळा. कारण, हा कष्ट करणाऱ्यांचा आणि जिद्दी माणसांचा व्यवसाय आहे. इथे दोन नंबरच्या व्यवसायाप्रमाणे लॉटरी अजिबात लागत नसते. आणि महत्वाचे म्हणजे असा दावा करणाऱ्यांची विश्वासार्हता तपासून पहायची असते. नाही म्हणायला एखादा यामध्ये अपवाद असूही शकतो. मात्र, नियम कष्टातून फळ मिळण्याचाच आहे.

Advertisement

तर, मित्रांनो आणि मैत्रिणींनोही, आपण आज गोठ्याचा बांधकामाच्या लेखातील पहिला भाग पाहणार आहोत. आपल्या शेळ्यांच्या जातीनुसार आणि शेळीपालन पद्धतीनुसार गोठ्याचे बांधकाम करावे. त्यासाठी शास्त्रीय माहितीची जोड देतानाच आपल्या खिशाची परिस्थिती लक्षात घेऊनच पुढे जावे. आपण गोठा हा लोकांना दाखवायला किंवा भूलावायला बांधत नसतो. तिथे शेळ्या, बोकड आणि करडे यांचे योग्य संगोपन करण्यासाठी आपण गोठ्याचे नियोजन करतो. यावर फोकस करूनच बांधकामाचे नियोजन करावे. शेळीपालन व्यवसायातील एकूण आर्थिक तरतुदीच्या २० टक्क्यापर्यंतच गोठा बांधकाम खर्चाचे नियोजन करावे. नाहीतर, मग हा व्यवसाय नफ्यात येण्यासाठी दीर्घकालीन वाट पाहण्याची तयारी ठेवावी.

Advertisement

गोठा बांधकामात पुढील गोष्टी लक्षात घेऊन बांधकाम करावे :

Advertisement
 • गोठ्यामधील शेडची लांबी कितीही वाढवली तरी चालू शकेल. मात्र, या निवारा शेडची रुंदी मात्र, जास्तीतजास्त ४० फुट असावी. त्यापेक्षा कमी असल्यास हवा मस्त खेळती राहते.
 • गोठ्यामध्ये चारा खाण्यासाठी गव्हाण असावी. तसेच, शेळ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी देणारी सोयही असावी. शक्यतो अशी गव्हाण कोरडी राहील असेच नियोजन करावे. तसेच पाणीही रोज बदलता येण्याजोगी सोय असावी.
 • एका शेळीला १.५ ते २ फुट रुंद जागा मिळेल अशा पद्धतीने गव्हाणीच्या बांधकामाचे नियोजन करावे.
 • आपण ज्या जागेवर गोठा उभारणार आहोत ती उंच ठिकाणी असावी. तिथे पाणी येणार नाही किंवा साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
 • गोठ्यापर्यंत जायला डांबरी नसला तरीही चालेल. मात्र, कच्चा आणि चांगला रस्ता असावा. चार चाकी किंवा तीन चाकी गाड्या त्या भागात येऊ शकतात असाच रस्ता असावा.
 • गोठ्यासाठीची जागा आपल्या घरापासून आणि मुख्य रस्त्यापासून टप्प्यात असावी. जास्त लांब असल्यास काही अडचणी येऊ शकतात. त्यानुसार नियोजन करावे.
 • उत्तम उतार असलेली, मुरमाड आणि शेड पूर्व-पश्चिम अशा पद्धतीने बांधकाम करता येईल अशीच जागा गोठ्यासाठी निवडावी.
 • स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील अशीच जागा गोठ्यासाठी उत्तम असते. जर जागा उताराची असेल तर सपाट करावी किंवा खोलात असेल तर भरून घ्यावी.
 • गोठ्याच्या आसपास हवेशीर आणि उन्हाळ्यात सावली देणारी झाडे असावीत. शेळ्या ज्या भागात बाहेर बसतात त्या ठिकाणी एखादे डेरेदार झाड असेल तर उत्तम.
 • गोठ्याच्या बाजूने ३-४ फुट उंचीची भिंत असावी. अशी भिंत असल्यास उन, वारा आणि पावसाचे पाणी यापासून शेळ्यांचे संरक्षण होते. शेडची रुंदी २० फुटांपेक्षा जास्त असल्यास याबाबत गरजेनुसार निर्णय करावा.
 • मध्यभागी किंवा एका बाजूला बांधलेल्या शेडच्या पत्र्यांचा आकार इंग्रजी A आकाराचा असावा. मध्ये १०-१२ फुट, तर कडेच्या बाजूने ८.५० ते ९ फुट उंच असेल असेच बांधकाम करून घ्यावे.

अशा पद्धतीने गोठ्याचे बांधकाम करताना काटेकोर नियोजन करा. दिखाऊपणासाठी शेळीपालन व्यवसाय करण्याचे टाळा. गोठ्यावर कमी खर्च करून दर्जेदार प्राण्यांच्या खरेदीसाठी जास्त आर्थिक तरतूद ठेवा.

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply