Take a fresh look at your lifestyle.

संजय राउत यांच्यावर दरेकरांनी केला ‘हा’ गंभीर आरोप; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

‘संजय राऊत हे विषयापासून पळ काढत आहेत, पण इथे प्रश्न “अनिल देशमुख” यांचा नाही तर  “गृह मंत्री” पदाचा, राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा आहे.  गृह मंत्री स्वतः १०० कोटीची खंडणी गोळा करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत आहेत, त्यामुळे पोलिसांची आणि राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. राज्याच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय आहे.  देशमुखांकडे व्यक्ती म्हणून न पाहता पोलिसांचे प्रमुख, राज्याचे गृहमंत्री म्हणून पाहिलं पाहिजे.  त्यामुळेच या विषयापासून संजय राऊतांना पळ काढता येणार नाही, ते  लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असं प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकरांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

Advertisement

गृहरक्षक दलात बदली झालेल्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परम बीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकार कोंडीत सापडल्याचं चित्र असून, दुसरीकडे भाजपाही आक्रमक झाली आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी,’अनिल देशमुखांचा प्रश्न हा काय राज्याचा प्रश्न आहे का?’ असा सवाल उपस्थित केला.  यावर प्रतिक्रिया देताना दरेकरांनी राऊतांचा समाचार घेतला.

Advertisement

परम बीर सिंग आता विरोधकांचे डार्लिंग बनले आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.  त्यावर दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिका रोज बदलत असतात, दोन दिवसांपूर्वीच परम बीर सिंग यांनी कोविड काळात केलेल्या उत्तम कामाबद्दल त्यांचा गौरव सामना मधून करण्यात आला होता. त्यामुळे परम बीर हे कुणाचे डार्लिंग आहेत, हे स्पष्ट होतं.  हे सर्व बाजूला सारुन परम बीर यांनी केलेल्या आरोपातील सत्यता पडताळणे महत्वाचे आहे.  परम बीर सिंग बचावासाठी आरोप करीत आहेत, असं जर सरकारला वाटत असेल तर मग सरकार त्यांच निलंबन का करत नाही ?  स्वत:च्या  बचावासाठी तर सरकार परम बीर सिंग यांच्यावर आरोप करीत नाही ना ?  सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का, अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनीच केली होती, त्या वाझेंचे काय झाले, हे सर्वाना माहीत आहे. सरकारच्या भूमिका सोयीनुसार बदलताना दिसून येत आहे, पण भाजपाविरोधात भूमिका घेऊन लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत असले तरी आता पुलाखालुन बरंच पाणी वाहून गेलं आहे, येणाऱ्या काळात गृह मंत्र्यांपासून अनेक लोकं कसे संबंधित आहेत, हे कळेलच, असा दावा दरेकर यांनी केला.

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply