मुंबई :
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी घोषणा केली असून टी -20 मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात काही नवीन तर काही जुन्या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेसाठी बूम बूम बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे तर हिटमन रोहित शर्मालाही विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा होती मात्र रोहित ही मालिका खेळणार आहे.
23 मार्च रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल, तर 26 मार्च रोजी मालिकेचा दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. याशिवाय मालिकेचा शेवटचा वनडे सामना 28 मार्च रोजी खेळला जाईल. आयपीएलपूर्वी ही शेवटची मालिका असेल. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे काम भारताने केले होते. भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध 5 टी -20 सामन्यांची मालिका देखील खेळत आहे. ही मालिका आता रोमांचक वळणावर आली असून पाचव्या सामन्यात मालिका कोण जिंकेल हे स्पष्ट होईल.
भारतीय एकदिवसीय संघात प्रसाद कृष्णा, कृणाल पंड्याचा समावेश करण्यात आला आहे, तर दुसरीकडे ईशान किशनला वनडे संघात स्थान मिळवता आले नाही. एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. तसच एकदिवसीय संघात टी. नटराजन, भुवनेश्वर, मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजी विभागाच्या भूमिकेत दिसतील. भारतीय वनडे संघात शुबमन गिललाही संधी मिळाली आहे. असा अंदाज वर्तविला जात होता की रोहित शर्माला विश्रांती दिली जाईल, पण रोहितदेखील वनडे मालिका खेळताना दिसणार आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंडविरूद्ध वनडे मालिका खेळताना दिसणार नाही. बुमराह नुकताच संजना गणेशनशी विवाहबंधनात अडकला आहे. बुमराहने लग्नासाठी एकदिवसीय आणि टी -२० मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते.
भारतीय संघ खालीलप्रमाणे आहे
विराट कोहली (कर्णधार ), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमान गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर, मोहम्मद सिराज, प्रसाद कृष्णा, शार्दुल ठाकूर.
संपादन : सचिन पाटील