Take a fresh look at your lifestyle.

Blog : एक किरण विझून जाताना..!

किरण बेदी हे नाव कोणे एकेकाळी एका वेगळ्या आदराने घेतले जायचे. तेही फ़क़्त भारतात नाही, तर जगभरात. परंतु, अण्णा आंदोलनानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून राजकारणात जाणे स्वीकारले. दिल्लीत त्यांना यश आले नाही. तर, त्या वेगळ्या मार्गाने पुन्हा साकीय झाल्या. नायब राज्यपाल बनल्या. आता त्यांच्याकडे कोणाचेही खास लक्ष नसते. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आणि वास्तव मांडण्याचा प्रयत्न शिक्षक व सामाजिक विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. फेसबुकवर कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख वाचकांसाठी आम्ही जसाच्या तसाच प्रसिध्द करीत आहोत..

Advertisement

तुम्ही तुमच्याच भूतकाळाशी विसंगत वागलात तर समाज तुम्हाला विसरून जातो याचे उदाहरण आज किरण बेदी ठरल्या आहेत. ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध तुम्ही लढलात त्या व्यवस्थेचे भाग होणे लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत.. १९९० साली दिल्लीला मी RD परेड ला गेलो. तेव्हा आमच्यापुढे व्याख्यानाला त्या आल्या होत्या. तेव्हा ते चैतन्य आजही आठवते आहे. पॉडेचरीचे नायब राज्यपाल म्हणून त्यांना अपमानकारकरित्या राष्ट्रपतींनी काढून टाकले परंतु त्याची रेषसुद्धा मीडिया व समाजात उमटली नाही..

Advertisement

भाजपाने ही त्याना उपयुक्तता संपल्यावर वाऱ्यावर सोडले. महाराष्ट्राच्या राज्यपालांवर इतकी टीका होते पण त्यांच्या पाठीशी उभे राहणारे केंद्र सरकार तेथील निवडणूक लक्षात घेऊन बेदीना परत बोलावते.. त्यापुढे त्या वादात त्या बरोबर होत्या की चूक हा मुद्दा गौण ठरला आहे. परंतु एकेकाळी कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तीला इतक्या अपमानकारकरित्या परत बोलावल्यावर काहीही प्रतिक्रिया समाजमनात उमटत नाही. याचे कारण समाज तुम्हाला जेव्हा आदर देतो तेव्हा तुमचे निर्णय हे समाजाला पटतील असेच असले पाहिजेत. किंवा तुमच्या मागील जीवनाशी सुसंगत असले पाहीजे…

Advertisement

तुमची व्यक्तिकेंद्रित प्रेरणा ही तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून व्यक्त होत असाल तर ती बाजूला ठेवायला हवी.. एकेकाळी याच किरण बेदी तरुण पिढीच्या आयकॉन होत्या. 1975 ते 2000 या काळात किरण बेदीच्या प्रेरणेने अनेक महिला व तरुणांमध्ये चैतन्य संचारले, एक धाडस रुजवले. त्याच किरण बेदी अण्णा हजारे यांच्या आंदोलनात आल्या. तर यांच्या ग्लॅमरचा आंदोलनाला नक्कीच उपयोग झाला. एक विश्वासार्हता मिळाली. परंतु ज्या काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय संस्कृती विरुद्ध आंदोलन केले त्याच भाजपात काही दिवसात त्यांनी प्रवेश केला आणि तिथेच त्यांचा समाज मनातील आदर संपला.

Advertisement

इथे मुद्दा भाजप हा नाही तर काँग्रेसमध्ये गेल्या असत्या तरी लोकांनी स्वीकारले नसते. कारण जनतेने तुम्हाला प्रस्थापित विरोधी भूमिका दिली होती.. त्यामुळे नंतर त्यांना पद मिळाले. परंतु त्या पदाने त्यांची प्रतिष्ठा वाढली नाही. उलट एक अनास्थाच समाजमनात निर्माण झाली. त्यामुळे नंतर त्या पदावर त्या राहिल्या काय किंवा गेल्या काही याचे कोणतेही सोयरसुतक जनतेला आज राहिले नाही.. त्यामुळे आज त्या पूर्णतः समाज मनातून विसरल्या गेल्या आहेत..

Advertisement

समाज ज्याना खूप आदर देतो असे लोक जीवनाच्या उत्तरार्धात अशा अनेक चुका करतात.. भाजपात प्रवेश करून मुख्यमंत्री व्हायला निघालेले श्रीधरन अशीच चूक करून बसले आहेत.. याचा अर्थ प्रसिद्ध व्यक्तींनी राजकारणात जाऊच नये का? असा विचारला जाईल. परंतु राजकारणात जाण्याची तुमची प्रेरणा कोणती आहे हे समाज ओळखत असतो.. आणि तुम्हाला जर प्रस्थापित संस्कृतीविरुद्ध तुम्ही लढला असाल तर तुम्ही त्या व्यवस्थेचा भाग होणे लोक स्वीकारत नाहीत.. किरण बेदी यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध या आंदोलनात भाग घेतल्यामुळे प्रस्थापित पक्षात जाणे हे अजिबात समर्थनीय ठरले नाही…

Advertisement

अनेक अधिकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ यशस्वी राजकारण केले आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्यासारखी काही उदाहरणे आहेत. परंतु पूर्णवेळ तळागाळातील राजकारणात सामील होणे वेगळे आणि केवळ सत्ताधारी एखादे पद देतील म्हणून वरच्या वर्तुळाच्या राजकारणात जाणे वेगळे हे लोक समजत असतात.. . तेव्हा एके काळी ‘आय डेअर’ या आत्मचरित्र शेकडो तरुणांना प्रेरित करणाऱ्या किरण बेदी अस्तंगत झाल्या आहेत…

Advertisement

एकेकाळी आमच्यासारख्या शेकडो तरुणांना अंगावर शहारे आणणार्‍या किरण बेदी आज ज्या प्रकारे केविलवाण्या झाल्यात ते बघून वाईटही वाटते आणि दुसरीकडे हा धडा घ्यायला हवा हेही लक्षात येते…

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply