‘अमित शहांच्या तब्येतीची चिंता’ म्हणून शिवसेनेने सांगितली दगाफटक्याची गोष्ट; वाचा, नेमका काय आहे विषय
मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज कोविडचे वाढते रुग्ण या विषयावर भाष्य केले आहे. यावेळी विरोधी पक्षालादेखील सुनावले आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-
प. बंगालात भाजपला विजय मिळवायचा आहे हे ठीक, पण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. बंगालातील जाहीर कार्यक्रमांत गृहमंत्री व त्यांचे सहकारी ‘मास्क’ न लावता किंवा ‘मास्क’ नाकाखाली ओढून ममतादीदींवर हल्ला करताहेत.
अशात कोरोनाच्या विषाणूने त्यांना दगाफटका केला तर कसे व्हायचे? आम्हाला त्यांच्या तब्येतीची चिंता वाटते म्हणून हे सांगायचे. ‘मास्क’ हीच लस आहे याचा विसर लोकांना पडला आहे. बाजारात कोरोनाची ‘लस’ आली आहे, पण लस घेऊनही लोकांना कोरोनाने पकडले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने आपण निघालो आहोत काय? अशी भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, पुन्हा लॉक डाऊन नको असेल तर नियमांचे काटेकोर पालन करा! पण लोक बेपर्वा होऊन गर्दी करीत आहेत, मास्क न लावता वावरत आहेत, उत्सव साजरे करीत आहेत.
मुंबईच्या जुहू चौपाटीवर 14 तारखेस तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी अशी उसळली की, मास्क न लावता, शारीरिक अंतराचे भान न राखता गर्दीने उच्चांक मोडला. त्या प्रेमी जिवांच्या चेंगराचेंगरीत कोरोना विषाणूही जणू स्वर्गवासी झाले. हे असे ठिकठिकाणी सुरूच आहे.
या सगळय़ा पायमल्लीमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गर्दीत विदर्भयात्रा सुरू केली. सांगलीतही मिरवणूक निघाली. आता जयंतराव कोरोनाग्रस्त होऊन तळमळत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या प्रेमातही कोरोना पडला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमारविरोधात ‘शूटिंग रोको’ आंदोलन करण्याची घोषणा करताच कोरोनाने त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला व नाना यांना विलगीकरणात जावे लागले. एकनाथ खडसे यांना सलग तिसऱयांदा कोरोना झाला आहे. हे जरा विचित्रच आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे आता कोरोनाच्या मिठीतून सुटत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, प्रशासन अशा प्रकारे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित
- मोदी तर ‘त्यांच्यापेक्षा’ महान, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर ‘तेव्हा’ झालाच होता; शिवसेनेने भाजपला करून दिली आठवण
- धक्कादायक : अंबानींच्या घराजवळ जिलेटिनवाली कार; पोलिसांचा तपास सुरू
- शिवसेनेचा शालजोडीतून टोला; मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून…
- ‘ती’ तर अंधभक्तांची पुढची पायरी; वाचा, मोदीभक्तांवर राऊतांनी का साधला निशाणा