कृषीप्रक्रिया उद्योग : अशा प्रकारे कवठापासून तयार करा जॅम आणि जेली; वाचा, संपूर्ण प्रोसेस
कृषीप्रक्रिया उद्योग हा शेतकर्यांना उन्नतीच्या मार्गाने नेणारा व्यवसाय आहे. शेतीकडे पुर्णपणे व्यवसाय म्हणून बघितले तर शेती नक्कीच फायद्यात ठरेल. शेती व्यवसाय आणि शेतकरी व्यवसायिक स्पर्धेत का मागे पडतो आहे, हे पाहणे महत्वाचे आहे. कवठापासून जॅम आणि जेली कसे तयार करायचे, याची प्रोसेस आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य :- कवठाचा रस – 1 लिटर, साखर- मध्यम पेक्टिन- 750 ग्रॅम, जास्त पेक्टिन- एक किलो.
कृती :-
- स्टीलच्या पातेल्यामध्ये रस मोजून घ्यावा. वापरावयाची साखर वजन करून त्यामध्ये मिसळावी. साखर पळीच्या सहायाने हलवून शक्य होईल तेवढी विरघळवून घ्यावी.
- नंतर पातेले शेगडीवर मंद आचेवर ठेवावे. मिश्रणातील साखर पूर्ण विरघळेपर्यंत पळीने सतत हलवावे. हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवावे.
- मिश्रणाचे तापमान 105 अंश सेल्सिअस आल्यावर त्याचे परीक्षण करावे. यासाठी एका चमच्यामध्ये थोडी जेली घेऊन ती थोडी थंड झाल्यानंतर चमचा हळूवारपणे तिरपा करावा. मिश्रण एकसंघ खाली पडले तर जेली तयार झाली असे समजावे किंवा मिश्रणाचा ब्रिक्स 70 डिग्री आल्यास जेली तयार झाली असे समजून शेगडीवरून पातेले खाली उतरून घ्यावे.
- पातेले दोन ते तीन मिनिटे स्थिर ठेवावे. या कालावधीत जेलीवर आलेली मळी स्टील झाऱ्याने अलगद काढून टाकावी.
- निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये जेली भरून पूर्ण थंड होईपर्यंत त्या उघड्यावर ठेवाव्यात. त्यांना निर्जंतुक केलेली झाकणे बसवावीत. बाटल्या हवाबंद करून त्यांची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
हेही घ्या लक्षात:-
- जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली, मोठ्या आकाराची व अर्धवट पिकलेली कवठे घ्यावीत.
- प्रथम ती स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. त्यानंतर ती फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा.
- स्टीलच्या पातेल्यामध्ये जेवढा गर तेवढेच पाणी मिसळून प्रतिकिलो गरास 1.5 ग्रॅम या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळावे.
- पातेले शेगडीवरती मंद आचेवर ठेवावे. मिश्रण शिजवत असताना ते पातेल्यास चिकटू नये यासाठी ते अधूनमधून पळीने हलवत राहावे.
- मिश्रणास उकळी आल्यानंतर ते अर्धा तास शिजवावे. नंतर पातेले खाली उतरून मिश्रण थंड झाल्यानंतर थोडे थोडे मलमल कापडावर टाकून हाताने हळुवारपणे दाबून त्याचा रस काढावा.
- फडक्यात राहिलेला चोथा वेगळा करावा. गाळून घेतलेला रस स्टीलच्या उभट भांड्यामध्ये एकत्र करून तो 24 तास एका ठिकाणी स्थिर ठेवावा.
- दुसऱ्या दिवशी उभट भांडे हळुवारपणे तिरके करून निवडलेला रस दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावा. भांड्याच्या तळाला साठलेला साका रसात येणार नाही याची काळजी घ्यावी.
- निवळलेला रस जेली तयार करण्यासाठी वापरावा.
- जेली तयार करण्यासाठी पेक्टिनचे परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रसातील पेक्टिनच्या प्रतीवरून त्यासाठी वापरावयाचे साखरेचे प्रमाण ठरवावे.
- काचेच्या पेल्यात एक चमचा रस घेऊन त्यामध्ये दीड चमचा मिथिलेटेड अल्कोहोल (रेक्टिफाईड स्पिरिट) मिसळून मिश्रण हलवावे. थोड्या वेळाने त्याचे परीक्षण करावे.
- मिश्रणाची एकच घट्ट गुठळी तयार झाल्यास अशा रसामध्ये पेक्टिनचे प्रमाण आहे असे समजावे. अशा रसासाठी एकास एक साखरेचे प्रमाण वापरावे. जर मिश्रणामध्ये लहान गुठळ्या झाल्या, तर त्यामध्ये पेक्टिनचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असते.
जाणून घ्या, जॅम बनवण्याची पद्धत:-
- जॅम करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत. कवठ फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा.
- एका पातेल्यामध्ये एक किलो गरास 200 मि.लि. पाणी मिसळून गर हाताने कुस्करून लगदा करावा.
- लगदा स्टीलच्या चाळणीत घेऊन तो हाताने दाबून त्याचा गर पातेल्यात काढून घ्यावा. तयार गर जॅम करण्यासाठी वापरावा.
- घटक पदार्थ –
- साहित्य – कवठाचा गर- 1 किलो, साखर- 1 किलो, सायट्रिक आम्ल- 2 ग्रॅम.
- कृती
- जॅम करण्यासाठी पातेल्यामध्ये गर आणि साखर एकत्र करून शेगडीवर ठेवावे.
- पहिल्या उकळीनंतर त्यात सायट्रिक ऍसिड मिसळावे.
- गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा ब्रिक्स मोजावा. 68 डिग्री ब्रिक्स येईपर्यंत जॅम शिजवावा.
- जॅम घरी तयार करत असताना एका प्लेटमध्ये पाणी घेऊन शिजवलेले मिश्रण चमच्याने थोडे घेऊन पाण्यामध्ये टाकावे.
- जर मिश्रण पाण्यामध्ये पसरले तर अजून शिजविण्याची गरज आहे असे समजावे. जर मिश्रण न पसरता गोळी तयार झाली तर जाम तयार झाला असे समजावे.
- तयार जॅम निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा. जॅमची दीर्घकाळ साठवण करायची असल्यास जॅमवर वितळलेल्या मेणाचा पातळ थर देऊन झाकण घट्ट लावावे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज