मुंबई :
राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महिला विद्यापीठ आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणे, अर्थसहाय्य करणे, विकसीत स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे, विकसीत स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविणे इत्यादी करिता हे इन्क्यूबेशन सेंटर काम करेल. या उपक्रमाने महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल व देशात महाराष्ट्र एक उदाहरण प्रस्तापित करेल, असा विश्वास मंत्री मलिक यांनी व्यक्त केला.
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये नुकताच स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे मलिक म्हणाले आहे.
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट