मुंडेंच्या निमित्ताने मोदींची आठवण; पहा, वकील सरोदे यांनी काय म्हटलेय ते

मुंबई :

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चहुबाजूने अडचण झाली आहे. कारण मुंबईतील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर आणि स्वत: धनंजय मुंडे यांनी आपले दुसऱ्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचं मान्य केले. आता या मुद्दयावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना वकील असीम सरोदे यांनी एक मोठी पोस्ट करत अत्यंत महत्वाचे मुद्द्यावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सरोदे यांनी :-  

धनंजय मुंडे यांचे कायदेशीर लग्न झाले आणि त्यांची कायदेशीर पत्नी आहे. त्यांनी दुसरे लग्न केले नाही. ते 2006 पासून एका स्त्री सोबत ‘ विवाहासारख्या ‘ संबंधात राहतात पण ती त्यांची कायदेशीर बायको नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी बायको बद्दलची माहिती लपविली असे म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपविली आहे. असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतीज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. कुणी तक्रार केली तर निवडणूक आयोग याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे लोकप्रतिनिधीत्व म्हणजेच आमदारकी रद्द करू शकते. निवडणूक आयोगाने स्वतःहून अश्या प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेतल्याची उदाहरणे नाहीत तसेच निवडणूक आयोग काहीच करीत नाही असाच सार्वत्रिक समज आहे.

यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी त्यांना बायको असल्याची माहिती न देताच प्रतीज्ञापत्र दाखल केले. खूप गाजावाजा झाला. मग पुढील निवडणुकीत मोदींनी बायको असल्याचे व लग्न झाल्याचे जाहीर केले. पण तेव्हाही मोदींवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मुलांबाबत माहिती न दिल्याने धनंजय मुंडेंवर निवडणूक आयोग कडक कारवाई करेल याबाबत साशंकता आहे. मात्र राजकीय व नैतिक अधिकार असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून काढू शकतात.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here