‘त्या’ देशात भारतीय व्यक्तीला तिरंगा फडकावणे पडले महागात; दिल्लीत गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण थोडक्यात

अमेरिकेच्या संसद कॅपिटल हिलच्या बाहेर झालेल्या हिंसाचारादरम्यान भारतीय ध्वज फडकाविणार्‍या व्यक्तीविरूद्ध दिल्लीच्या काळकाजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिन्सेंट झेविअर असे या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. वस्तुतः बुधवारी वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटल हिल येथे ट्रम्प समर्थकांनी मोठा धिंगाणा करत अराजक माजविले. यावेळी ट्रम्प समर्थकांच्या बॅनर, पोस्टर्स आणि झेंडे यांच्यात भारतीय ध्वजही लहरताना दिसले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले.

वृत्तानुसार, व्हिन्सेंट मूळचा केरळमधील कोचीचा रहिवासी असून तो भारतीय वंशाच्या लोकांपैकी एक आहे. व्हिन्सेंट यांची ट्रम्प प्रशासनाने राष्‍ट्रपतीच्या एक्सपर्ट परिषदेमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. न्यूज 18 च्या वृत्तानुसार व्हिन्सेंटने सांगितले की, तो या निवडणुकीच्या विरोधात निषेध करण्यासाठी गेला होता, त्याचा हिंसाचाराशी काही संबंध नाही. या रॅलीत 10 भारतीय होते, ज्यात मूळचे केरळचे पाच लोक होते.

रॅलीतील भारतीय ध्वज फडकवण्यामागचा हेतु सांगताना ते म्हणाले की, ट्रम्पच्या समर्थनार्थ ही रॅली असून ही काही वर्णद्वेषाची चळवळ नव्हती हे त्यांनी दाखवायचे होते. ही वर्णद्वेषाची चळवळ असती तर आम्ही  भारताचा ध्वज बाळगू शकलो नसतो.

मी जेव्हा जेव्हा ट्रम्पच्या रॅलीत गेलो आहे, तेव्हा तिथे व्हिएतनामी, कोरियन आणि अगदी पाकिस्तानी वंशाच्या लोकांनीही आपल्या देशाचे झेंडे धरलेले पाहिले आहेत, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

दरम्यान या हिंसाचारात 4 लोकांचा मृत्यू झाला. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रंप यांच्या समर्थकांनी मोठा गदारोळ माजवला. पोलिस आणि समर्थक कार्यकर्ते यांच्यात मोठी झटापट झाली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here