हिवरे बाजार निवडणूक : ‘परिवर्तन’वाल्यांना वाटतेय भीती, पोलीस संरक्षणाची केली मागणी..!

आदर्श गाव म्हणून ओळख असलेले विद्यमान उपसरपंच पद्मश्री पोपट पवार यांचे हिवरे बाजार (ता. अहमदनगर) हे गाव आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात चर्चेत आलेले आहे. कारण, 30 वर्षांनी येथे निवडणूक होतानाच परिवर्तनाची हाक देणाऱ्या पॅनेलने त्यांना पवारांच्या ‘आदर्श’ची भीती असल्याचे कारण देऊन पोलीस संरक्षण मागितले आहे.

पद्मश्री पवार यांच्या हिवरेबाजार येथे तब्बल ३० वर्षांनी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लढणाऱ्या परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना जीवाची भीती वाटते, असे निवेदनच ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी पोलिसांना दिले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूकी करीता गावच्या विकासासाठी स्वतंत्रपणे परिवर्तन ग्रामविकास पॅनलची निर्मीती करुन सदर पॅनल अंतर्गत आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले आहे. गावाच्या विकाकासाठी स्वतंत्र पॅनल उभा केला म्हणून राजकीय विरोध सुरु झाला आहे. त्यातुनच धमकावले जात आहे. प्रचारामध्ये अडथळा निर्माण करण्याची दाट शक्यता असल्याने गावामध्ये निवडणूकीच्या दरम्यान राजकीय वाद उपस्थित करुन वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे.

जीवाची भीती असल्याचे सांगत परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी म्हटले आहे की, हिवरे बाजार गावातील ग्रामपंचायत निवडणूक सनदशीर मार्गाने पार पडण्यासाठी व आमच्या जीवाला राजकीय विरोधक यांच्याकडून धोका निर्माण झाला असल्याने सदर निवडणूकीच्या कार्यक्रमामध्ये व निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडणूक होईपर्यंत पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक व गरजेचे आहे.

विरोधात ग्रामपंचायत निवडणूक लढवत असल्याने गावातील राजकीय विरोधकांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला आहे. तशा पद्धतीने गावामध्ये चर्चा घडवून आणली जात आहे. त्यामुळे ते कधी काय कृती करतील याचा नेम नाही. तरी आमच्या अर्जाचा गांभीर्याने विचार करुन आम्हास सदर ग्रामपंचायत निवडणूक २०२१ चे निवडणूक कालावधीसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र टाईम्स आणि इतर वृत्तपत्रांनी या बातमीस प्रसिद्धी दिली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here