म्हणून चंद्रकांतदादांना शेतकरीपुत्राने लिहिलेय पत्र; वाचा नेमके काय म्हटलेय त्यात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेहमीप्रमाणे भाजपचा अजेंडा किती बेस्ट आहे हे सांगताना शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. त्यामुळे संतापलेल्या तुषार गायकवाड या शेतकरी पुत्राने त्यांच्या नावाने एक पत्र व्हायरल केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, संदर्भीय विषयानुसार आपणास लक्षात आणून देऊ इच्छितो की, दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी मूठभर नाहीत. आणि आपल्या दृष्टीने जरी ते मूठभर असले तरीही माजलेल्या छटाकभर सत्ताधाऱ्यांना पुरुन उरतील इतके समर्थ आहेत. आपल्या ज्ञानाचा आवाका एखाद्या सायंशाखेत दिल्या जाणाऱ्या बौद्धिका इतकाच असल्याने आपणांस आपल्या ज्ञानाचा आवाका वाढवणे गरजेचे आहे.

मूठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. मूठभर लोकांना सोबत घेऊन संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी भिक्षुकशाहीचे बंड मोडून काढले. मूठभर सहकारी सोबत घेऊन क्रांतीज्योती महात्मा फुलेंनी मनुस्मृतीसह मनुवाद जाळला. मूठभर सहकारी सोबत घेऊन महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला. मूठभर सहकारी सोबत घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व पश्चिम महाराष्ट्रात प्रतिसरकार (पत्रीसरकार) निर्माण केले. मूठभर सहकारी घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस बाबूंनी सशस्त्र आझाद हिंद सेना निर्माण केली, असेही त्यात म्हंटले आहे.

मूठभर सहकारी सोबत घेऊन शहीद ए आजम भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी ब्रिटिश हुकुमतीची पाळेमुळे लुळीपांगळी केली. मूठभर महार बटालियनने पेशवाईचा अंत केला. मूठभर सहकारी सोबत घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रह केला. गांधी हत्येनंतर देशभरात पेढे वाटणाऱ्या मूठभर विकृतांचे जळीतसुद्धा मूठभर लोकशाहीप्रेमी भारतीयांनीच केले. त्यासाठी पाकिस्तानातून लोक आले नव्हते. मूठभर भारतीय जवानांच्या तुकडीने कारगीलचा विजय मिळवून दिला, याची आठवण तुषार गायकवाड यांनी करून दिली आहे.

भारतासह जगभरात जिथे जिथे क्रांती झाली त्या क्रांतीची सुरुवात मूठभर लोकांनीच केली हे त्रिकालबाधीत सत्य आहे. तेव्हा अभ्यासाचा आवाका वाढवा आणि शेतकरी आंदोलनाबाबत असंवेदनशील वक्तव्ये टाळा. सत्तेचा माज फार काळ टिकत नसतो हे आपण महाराष्ट्रात गेले दिड वर्ष अनुभवत आहातच! ‘शहाण्याला शब्दाचा मार’ आणि ‘सूज्ञांस सांगणे न लगे’ असे म्हणतात. त्याप्रमाणे अधिक काही सांगू इच्छित नाही. आम्ही मूठभर शेतकरी कृषकांच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकणारे तीन काळे कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही हे स्वतःच्या मेंदूला आणि आकांना ठणकावून सांगा. लक्षात रहात नसेल तर सदऱ्याच्या पंख्याला एक गाठ मारुन फिरा. जसे अर्णब गोस्वामीच्या अटकेवेळी काळ्या फिती लावून हिंडत होता तस्सेच!, असेही त्यात म्हटले आहे.

स्त्रोत : फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here