आदर्श गावांमध्ये रंगणार निवडणुकीचा आखाडा; म्हणून अण्णा हजारे, पोपट पवारांच्या गावात ‘बिनविरोध’ला खीळ

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र राज्यभर बिनविरोध निवडणूक करण्याचा ट्रेंड आलेला होता. मात्र, त्याला अनेक गावांनी प्रतिसाद दिलेला असतानाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांच्या गावात ‘बिनविरोध’ला खीळ बसली आहे.

कोणत्याही गावात, पदावर किंवा सत्तेच्या ठिकाणी नव्या नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. कोणताही माणूस कितीही चांगले काम करू देत, नव्या दमाच्या अनेकांना आपण यापेक्षाही बेस्ट काम करून दाखवण्याचा विश्वास असतो. त्याच मानसिकतेमुळे यंदा आमदार निलेश लंके आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रयत्न करूनही राळेगणसिद्धी (ता. पारनेर) हे गाव बिनविरोध होऊ शकले नाही. तसाच प्रकार पद्मश्री पोपट पवार यांच्या हिवरे बाजार (ता. अहमदनगर) या गावातही घडला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण विकासाचे आदर्श उदाहरण म्हणून या दोन्ही गावांची ओळख जगभरात आहे. आता त्याच गावाला नवीन नेतृत्वाची आस लागली आहे की नाही, हे निवडणुकीच्या रिंगणातून आलेल्या निकालावर स्पष्ट होणार आहे.

हिवरे बाजार या गावात तर तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे. लोकशाहीची प्रक्रिया बळकट करणाऱ्या या निवडणुकीसाठी यंदा या गावात प्रचार, मतदान, मतमोजणी आणि निकाल असे सगळे सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही गावांतील निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष असेल.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here