‘झोळी रिकामीच’ म्हणत ‘त्या’ मुद्दयावरुन राऊतांनी हानला मोदींना सणसणीत टोला

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज रोखठोक या सदरात खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

नेमक काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये :-

देशाला, लोकांना दुरवस्थेला नेणारे वर्ष म्हणून 2020 हे वर्ष दीर्घकाळ लक्षात राहील. जगाच्या बाबतीतही तेच घडले आहे. ‘कोविड-19’ नावाच्या विषाणूने संपूर्ण जगाची एक बंदिशाळा केली. त्या बंदिशाळेचे दरवाजे नवीन वर्षातही उघडण्याची चिन्हे दिसत नाहीत. लोकांनी नाताळ, नवीन वर्षाचा स्वागत उत्सव साजरा करू नये म्हणून रात्रीची संचारबंदी सुरू केली. ती 6 जानेवारीपर्यंत चालेल. म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करताना उत्साहास आवर घाला, असे स्पष्ट आदेश आहेत. सारेच जग संकटात सापडले. पण अमेरिकेने आर्थिक अरिष्टात सापडलेल्या त्यांच्या नागरिकांना चांगले पॅकेज दिले. प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या बँक खात्यावर महिन्याला 85 हजार रुपये जमा होतील असे हे पॅकेज आहे. ब्राझील, युरोपातील देशांतही हे झाले, पण मावळत्या वर्षात हिंदुस्थानी जनतेची झोळी रिकामीच राहिली.

टाळेबंदीतला देश

मावळत्या वर्षाने काय पेरले, काय दिले ते आधी समजून घ्या. ‘कोविड-19’ म्हणजे कोरोनामुळे देश सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टाळेबंदीतच राहिला. या काळात उद्योग बंद पडले. लोकांनी नोकऱ्य़ा गमावल्या. लोकांचे पगार कमी झाले. शाळा, कॉलेज बंद आहेत. आजही मॉल्स, सिनेमा थिएटर्स, नाटक उद्योग, हॉटेल्स- रेस्टॉरंट बंधनात आहेत. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे. कोरोना काळात देशात परकीय गुंतवणूक येत आहे. यातील बरीचशी गुंतवणूक ही सामंजस्य करारातच अडपून पडली. महाराष्ट्रात 25 कंपन्यांनी 61 हजार 42 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. त्यातून अडीच लाख नवे रोजगार निर्माण होतील, पण त्याचवेळी पुण्याजवळ तळेगावचा जनरल मोटर्स कारखाना बंद पडत आहे व 1800 कामगारांच्या चुली विझताना दिसत आहेत. हिंदुस्थान-चीनमधील तणावातून निर्माण झालेले हे संकट आहे. चीनचे सैन्य 2020 मध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले. त्यांनी आपली जमीन ताब्यात घेतली. चिनी सैनिकांना आपल्याला मागे ढकलता आले नाही, पण लोकांचे लक्ष या संकटावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादाची नवी काडी टाकली गेली. चिनी माल व चिनी गुंतवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रचार झाला. चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आर्थिक संकटात सापडलेल्या जनरल मोटर्स कंपनीत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार होती. आता ते होणार नाही. त्यामुळे जनरल मोटर्स बंद होईल. चिनी गुंतवणूक रोखण्यापेक्षा चीनचे सैन्य मागे ढकलले असते तर राष्ट्रवाद प्रखर तेजाने उजळून निघाला असता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here