एकाच वेळी ‘पवारांचे कौतुक तर काँग्रेसवर टीका’; शिवसेनेला पडणार महागात?

मुंबई :

आजही महाविकास आघाडीत अधून मधून कुरकुर होत असल्याचे काही न काही निमित्ताने समोर येत असते. दरम्यान आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज शिवसेनेने आज काँग्रेसवर टीका करत राहुल गांधींविषयी परखड मत व्यक्त केले आहे. तसेच शरद पवारांचे कौतुकही केले आहे. त्यावरून आता महाविकास आघाडीमधील काँग्रेस नेते नाराज होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे शरद पवारांनी राहुल यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे आधीच राष्ट्रवादीवर नाराज असलेले काँग्रेस नेते शिवसेनेवर नाराज झाल्यास हे शिवसेनेला चांगलेच महागात पडू शकते.    

नेमकं काय म्हटलं शिवसेनेने :-

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तर यूपीएतील इतर घटक पक्षांची साधी सळसळही जाणवत नाही. शरद पवार यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, राष्ट्रीय पातळीवर आहेच व त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा आणि अनुभवाचा फायदा पंतप्रधान मोदींपासून इतर सगळेच पक्ष घेत असतात. ममता बॅनर्जी या प. बंगालात एकाकी लढत देत आहेत. भारतीय जनता पक्ष तेथे जाऊन कायदा, घटनेची पायमल्ली करतो. केंद्रीय सत्तेच्या जोरजबरदस्तीवर ममतांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा देशातील विरोधी पक्षाने एक होऊन ममतांच्या पाठी उभे राहणे गरजेचे आहे; पण या काळात ममता यांची फक्त शरद पवार यांच्याशीच थेट चर्चा झालेली दिसते व पवार आता प. बंगालात जात आहेत. हे काम काँग्रेसच्या नेतृत्वाने करणे गरजेचे आहे. 

आज वर्षभर काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत व काँग्रेसचे हंगामी नेतृत्व करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत डोलारा चोख सांभाळला आहे, पण त्यांच्या भोवतीचे जुनेजाणते नेते आता अदृश्य झाले आहेत. मोतीलाल व्होरा, अहमद पटेल यांच्यासारखे जुनेजाणते पुढारी काळाच्या पडद्याआड गेले. अशा वेळी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, यूपीएचे भविष्य काय, हा भ्रम कायम आहे. सध्या एनडीएत कोणी नाही तसे यूपीएतही कोणीच नाही, पण भाजप पूर्ण बळाने सत्तेवर आहे व त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखे भक्कम नेतृत्व व अमित शहांसारखे राजकीय व्यवस्थापक आहेत. तसे यूपीएत कोणी दिसत नाही. लोकसभेत काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद मिळवावे इतके संख्याबळ नाही. 

राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. कमलनाथांचे मध्य प्रदेश सरकार स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच पाडल्याचा स्फोट भाजप नेते करतात. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकडय़ा अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष! देशासाठी हे चित्र बरे नाही. काँग्रेस नेतृत्वाने याचा विचार केला नाही तर येणारा काळ सगळय़ांसाठीच कठीण आहे, अशी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here