उद्योजकांची दशसुत्री; यशही शाश्वत नाही, तसे अपयशही, म्हणून वाचा महत्वाची माहिती

सध्या करोना विषाणूच्या संकटकाळी अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. काहींना पुन्हा नोकऱ्या मिळत आहेत, काहीजण नोकरी मिळत नसल्याने व्यवसाय चाफत आहेत, तर काहीजण व्यवसाय करण्यासाठी धडपडत आहेत. त्यापैकी काहींना यश मिळते, तर काहीना यातून धडा मिळतो.

मित्रांनो, अशावेळी यश मिळण्यासाठी काही खास गाईड आहे का, याचीही विचारणा अनेकजण करतात. मात्र, यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, ना त्यासाठी कोणताही मार्ग आखलेला असतो. आपल्या पद्धतीने नियोजन करून आणि ऐनवेळी येणाऱ्या संकटांवर मात करून व्यवसायात किंवा अगदी जीवनातही यशाचा मार्ग प्रशस्त करावा लागतो.

त्यासाठी आज आपण काही मार्गदर्शक तत्वे पाहूयात :

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण सर्वप्रथम नवीन काय जगात येत आहे, आणि परंपरागत पद्धतीत चांगले काय व त्यातील त्रुटी काय हे समजून घ्यायला शिका.

आधुनिकीकरणाच्या काळात जगभरात होणारे बदल लक्षात घेऊन त्यासाठी स्वतःला आणि आपल्या टीमला तयार करा.

आपल्याकडे उपलब्ध असलेले भांडवल, व्यावसायिक जोखीम आणि वेटिंग पिरीयड यांची सांगड घालून व्यवसायाचे नियोजन करावे. आपल्याकडे एक म्हण आहे की, अंथरून पाहून पाय पसरावे. मात्र, इथे अंथरून पाहून नाही, पण आपली जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन व्यवसाय कोणता आणि किती मोठ्या पद्धतीने सुरू करावा याचे नियोजन करावे.

कार्यक्षम व्यवस्थापक हा कोणत्याही व्यवसायाचा कणा असतो. जर, आपल्याकडे असे कौशल्य नसतील तर विकसित करा आणि योग्य व्यक्तींना योग्य जबाबदारी देऊन कामाची वाटणी आणि व्यवस्थापन करा.

कष्टाला कुठेही पर्याय नसतो. तसाच आपण करीत असलेल्या व्यवसायात रिंगणात उतरून काम करण्याची तयारी असेल तरच व्यावसायिक फंदात पडा. सगळे काही कर्मचारी भरोसे असेल तर व्यवसाय करूच नका.

उत्पादन खर्चासाठी लागणारी बचत हीच नफा कमावण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे गरज नसेल अशा वस्तू आणि वाढीव खर्च अजिबात करू नका.

वृद्धीची संधी दररोज मिळते असे नाही. अशा वेळेसाठी सज्ज रहा. मात्र, त्यासाठी अजिबात अट्टाहास करू नका. यश मिळाले की लगेच उतमात अजिबात करू नका. कारण, जसे अपयश शाश्वत नाही, तसेच यशही शाश्वत नाही.

व्यवसायाच्या नोंदी नियमित ठेवा. त्यात हलगर्जीपणा नको. नवीन माहिती घेत रहा. आपल्या स्पर्धक कंपन्यांची किंवा व्यावसायिक मंडळींची माहिती अपडेट ठेवत जा.

उत्तम गुणवत्ता, सुरक्षितता आणि ग्राहकांचे समाधान या तिन्ही सूत्रांवर श्रद्धा ठेवा. यश मिळाले की लगेच काहीतरी शॉर्टकट मारून जास्त पैशांचा हव्यास करू नका. कारण, असे वाटणे हेच आपली व्यवसायातील अधोगती आणखी वेगवान करू शकते.

आपल्याकडील टीम एकदम सक्षम असेल असे नाही. कारण, कोणताही माणूस जसा परफेक्ट नसतो, तसेच टीमचे असते. मात्र, टीममध्ये असणारा विश्वास आणि संवाद खूप महत्वाचा आहे. तो कायम राहील आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होईल याची काळजी घ्या.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता. क. : आपल्याकडे कोणतीही ठोस कल्पना असेल तर आम्ही त्याला साकार करू. कंपनी नोंदणी, ट्रेडमार्क, तंत्रज्ञान सल्ला आणि उद्योग मार्गदर्शन यासाठी आम्हाला krushirang@gmail.com यावर संपर्क साधावा. (सल्ला व मार्गदर्शन मोफत नसेल. तसेच कोणता उद्योग करावा यासाठी सल्ला मागायला अजिबात संपर्क करू नये. व्यवसाय आपण निवडावा. आपली बौद्धिक व आर्थिक क्षमता आणि जोखीम पत्करण्याची तयारी यानुसार व्यवसाय निवडावा. आम्ही त्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन करू.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here