अजितदादा तर ‘त्यांच्या’पेक्षा वरचे निघाले म्हणत फडणवीसांनी साधला निशाणा; वाचा, काय आहे विषय

पुणे :

कोरडवाहू जमिनीसाठी २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी जाहीर केले. त्यात आमचे अजितदादा तर त्याहीपेक्षा वर निघाले. उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता, बागायतदारांना तर दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. पण कसले ५० हजार, २५ हजार आणि दीड लाख, राजा उदार झाला नाही, तर उधार झाला, हाती भोपळा आला, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी फडणवीस पुण्यातील मांजरीत आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस यांनी विमा योजनेचा विषय काढत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना आणली होती. त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. आता शेतकऱ्यांवर संकट कोसळलं तर, एक नवा पैसाही विम्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळाला नाही. ही विमा योजना आम्ही चार वर्षे चांगल्या प्रकारे लागू केली होती. या सरकारने ही विमा योजनाच एकप्रकारे बासनात गुंडाळून ठेवली, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

आताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारा, त्यांचा विचार करणारा कुणीही नाही. आम्ही शेतकऱ्यांना पैसा दिला. ज्या-ज्या वेळी संकट आलं त्या-त्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलो. आज काही झालं तरी त्यांच्याकडे ढुंकूणही पाहिले जात नाही. शेतकऱ्याचा विचारही केला जात नाही, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here