रजनीकांत म्हणजे अमुक अमुक अशी ओळख करून देणं म्हणजे मूर्खपणाचे आहे. कारण तो एकमेव असा सुपरस्टार आहे ज्यावर सगळ्यात जास्त जोक केले जातात. हे जोक पण जबरी असतात. ज्या गोष्टी सामान्य माणसाला करणे शक्य नसते ते रजनीकांत करतो. म्हणजेच रजनीला काहीच अशक्य नाही म्हणुनच कदाचित आज वयाच्या ६७व्या वर्षीही त्याच्याइतकी कमाई करणारा सुपरस्टार जगाच्या पाठीवर सापडत नाही. आज रजनीकांतला कुठल्याही ओळखीची गरज राहिलेली नाही. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९५० ला झाला असून आज त्याचे चाहते त्याचा जन्मदिवस जागतिक स्टाईल दिन म्हणुन साजरा करतात. ज्या रजनीकांतला आज जगभरात रजनी, थलैवा, सुपरस्टार, बॉस अशा नावांनी ओळखले जाते. ज्या रजनीकांतची जगातील सर्वात जास्त चाहता वर्ग असणारा अभिनेता म्हणुन गिनीज बुकात त्याची नोंद आहे.तोच रजनी एकेकाळी सुतारकाम करत होता. सुरुवातीच्या काळात खुप हालअपेष्टा सोसुन कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मदत केली. बंगळुरमध्येही कुली काम करत अखेरीस तो ७५०रु. पगारावर बस कंडक्टर म्हणुन नोकरीला लागला.
रजनी एकदम अवलिया माणूस होता. बसमध्ये बोटांवरुन चिल्लर फिरवायचा, बस थांबवण्यासाठी घंटी वाजवण्याऐवजी शिट्टी वाजवायचा. त्याची सिगरेट पेटवण्याची हटके स्टाईल यामुळे रजनीकांत नोकरीमधेही फेमस झाला.
रजनीकांत बाबत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो मराठी आहे आणि आजवर त्याने कधीच मराठी चित्रपटात काम केलेलं नाही. रजनी मराठी असला तरी त्याचा जन्म बंगळुर येथे झाला. त्याचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी येथील आहेत. रजनीकांतचे नाव शिवाजी गायकवाड असुन तो छत्रपती शिवाजी महाराजांचा खुप मोठा चाहता असुन महाराजांचे भले मोठे पेंटिंग त्याच्या घरात लावलेले आहे. तसेच रजनीकांतचे कुलदैवत हे जेजुरीचा खंडेराया आहे.
रजनीकांतविषयी काही विशेष गोष्टी आणि त्याच्या नावे असलेले विक्रम :-
- आशिया खंडातील हॉलीवुड अभिनेता जॅकी चॅन नंतर सर्वाधिक मानधन (२६ कोटी – शिवाजी द बॉस) घेणारा तो अभिनेता आहे.
- दक्षिण भारतात त्याच्या नावावर सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहेत.
- रजनीकांतचे प्राथमिक शिक्षण आचार्य पाठशाळा बंगळुर येथे तर उच्चशिक्षण बंगळुरच्या रामकृष्ण मिशनच्या कॉलेजमध्ये झाले. त्याने मद्रास फिल्म इन्स्टिट्युटमध्ये अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला.
- रजनीकांतचा २००२ मधील बाबा आणि २००८ मधील कुसेलन हे चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर त्याने स्वतःच्या खिशातुन डिस्ट्रिब्युटर्सला नुकसानभरपाई दिली होती.
- भारत सरकारने रजनीकांतला २००० मध्ये पद्मभुषण आणि २०१६ मध्ये पद्मविभुषण पुरस्काराने गौरविले आहे. त्याचबरोबर जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार, जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझीनमध्ये जगातील प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये स्थान असे विविध सन्मान त्याला मिळाले आहेत.
- धोतर कुर्ता हा त्याचा आवडता पोशाख आहे. मसाला डोसा हा खाद्यपदार्थ त्याला आवडतो. रजनीकांतला फार्महाऊसवर राहायला आवडते. तो त्याच्या चेन्नईतील आलिशान अशा Poes Garden या बंगल्यावर क्वचितच असतो.
- रजनीकांत आज जगातील कोणतीही वस्तु विकत घेण्यास सक्षम असला तरी अजुनही आपल्या जुन्या वस्तुच वापरतो. जसे की कपडे, जुनी चित्रे, त्याची जुनी गाडी.
संपादन : स्वप्नील पवार
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने