सलग 5 दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याच्या किमतीत झाले ‘असे’ बदल; वाचा, काय आहेत ताजे दर

मुंबई :

जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने भारतीय सराफातही सोन्याचे आणि चांदीचे दर काही प्रमाणात घसरले. मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 243 रुपयांनी कमी होऊन 49,653 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा भाव 216 रुपयांनी कमी होऊन 67,177 रुपये प्रति किलो झाला.

गेल्या 5 दिवसांपासून सोन्या चांदीचे दर सतत वाढत होते. आज मात्र त्याला ब्रेक लागला. युरोप आणि अमेरिकेतील करोना रुग्ण वाढत असल्यामुळे गुंतवणूकदार काही प्रमाणात सोने खरेदी करून ठेवत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत, असा अंदाज तज्ञ मंडळी सांगत आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती सापडल्याने तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. त्याचाही सोन्या-चांदीच्या जागतिक बाजारावर परिणाम होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आण चांदीच्या दरात सोमवारी मोठी तेजी पाहायला मिळाली होती.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी यांनी सांगितले की, अमेरिकन कॉंग्रेसने 900 अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजूरी दिली आहे. त्यामुळे डॉलरचा भाव वाढत गेला. ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या करोनामुळे जागतिक विमान वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीत संदिग्धता निर्माण झाल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम संभवतो. त्यामुळे सोने जास्त प्रमाणात घसरण्याची शक्‍यता नजीकच्या भविष्यात कमी आहे असे विश्‍लेषकांना वाटते. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here