बापरे … ‘त्या’ कारणामुळे झाले द्राक्ष उत्पादकांचे १०० कोटींचे नुकसान; वाचा काय घडला प्रकार

नाशिक :

नाशिकच्या कसमादे पट्ट्यात द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित संकटांमुळे शेती आणि व्यवसाय क्षेत्राला मोठा झटका बसला. जास्त पावसामुळे मागच्या वर्षी या कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी द्राक्ष बागा संकटात सापडल्या होत्या. त्यावेळी झालेल्या नुकसानीनंतरही शेतकर्‍यांनी या वर्षीही द्राक्ष उत्पादन करण्याचे ठरवले. मात्र यावर्षीही अवकाळीच्या तडाख्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकर्‍यांनी तडाख्यातून वाचलेला माल जपवायचे ठरवले. जेणेकरून या मालातून तरी थोडी आर्थिक तजवीज होईल, हा हेतु होता. मात्र  चालू वर्षी जूनच्या सुरुवातीपासूनच असलेल्या पावसामुळे घड जिरणे, गळकूज या समस्येने ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते. तसेच अवकाळीनंतर द्राक्ष मण्यांना तडे जाऊन सडकूज होताना दिसत आहे. एकूणच काय तर या पट्ट्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या नशिबी नुकसानच आले आहे. काढणीच्या अवस्थेत असलेल्या जवळपास १२०० एकरांवरील बागांमध्ये द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यातच पडणाऱ्या धुक्यामुळे तडे जाऊन द्राक्षांचे मणी जागेवरच कुजत आहेत.

या  पट्ट्यात असणार्‍या एकूण बागांची परिस्थिती लक्षात घेता 100 कोटींच्या आसपास नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. ज्यांचा काही माल निघाला आहे तेही अडचणीत आहे कारण प्रतवारी बिघडल्याने नीचांकी दराने बाजारात खरेदी सुरू आहे. त्यामुळे १०० रुपये सरासरी दर असतानाही २० ते २५ क्विंटल हाती आलेल्या मालाची काढणी होऊनही उत्पादन खर्च वसूल झालेला नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here