भातखळकरांनी ठाकरेंना दिले ‘हे’ आव्हान; सौनिक समितीचा अहवाल खुला करण्याची केली मागणी

मुंबई :

आरे येथील मेट्रो कारशेडला सर्व परवानग्या मिळाल्या असताना आणि तेथील 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालेले असतानाही कारशेड इतरत्र हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. असा निर्णय घेताना मुंबईबद्दल ‘चांगलाच’ विचार मुख्यमंत्र्यांनी केला असल्याने मुख्यमंत्र्यांनी नवीन ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याच्या नियोजनाचे ब्लु प्रिंट मुंबईतील लोकप्रतिनिधीना सादरीकरण करण्याचे आव्हान मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिले आहे.

त्यांनी प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड आरे येथून कांजूरमार्ग येथे हलविण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊन राज्य सरकारला जोरदार चपराक दिली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी ठाकरे सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या सौनिक समितीचा अहवाल सुद्धा अद्याप खुला करण्यात आलेला नाही. कांजूरमार्ग येथील जागेचे पुढे काय होणार हे अद्याप ठरले नसताना सुद्धा आता महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मेट्रो कारशेड बिकेसी येथे हलविण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे सांगून मुंबईकरांच्या मनात आणखीनच गोंधळ निर्माण केला आहे.

मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान पाच वर्षाचा वाढीव कालावधी लागणार असून दिवसाला अडीच कोटींचे नुकसान होणार आहे. याचा संपूर्ण भुर्दंड मुंबईकरांच्याच माथी मारला जाणार आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जनतेच्या मनातील हा गोंधळ व रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नियोजित केलेला आराखडा मुंबईतील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधीच्या समोर मांडावा व सौनिक समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करावा. तसेच आरे मधून कारशेड इतरत्र हलविण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी कोणता ‘चांगला’ विचार केला होता हे सुद्धा जनतेला सांगावे अशी मागणी सुद्धा भातखळकर यांनी केली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here