अस्थिरतेच्या काळात खात्रीशीर उत्पन्न हवंय; ‘हे’ आहेत पर्याय

कोरोनामुळे जगभरात अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. सध्या शेअर बाजारात मोठे चढ-उतार चालू आहेत. तेलाच्या किमतीचीही हीच अवस्था आहे. धातूबाबतही हीच परिस्थिती आहे. अमेरिकेत तर दहा लोकांमागे एक जणाची नोकरी जाणार आहे हे नक्की. कोरोनामुळे मोठी आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. समाजातील काही घटक हे व्याजावर अवलंबून असतात. त्यांची सुद्धा चिंता वाढलेली आहे. अशा वेळी बाजारात निश्‍चित किंवा खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत हे पाहुयात

1) बॅंकांतील एफडी : स्टेट बॅंकेसारख्या सर्वांत मोठ्या सरकारी बॅंकेतील एफडीचे व्याजदर कमी केले आहेत. ते आता 5.70 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहेत. हे व्याज करपात्र असल्याने 30 टक्‍क्‍यांच्या टॅक्‍स स्लॅबमध्ये मोडणाऱ्यांना अवघा 3.9 टक्के परतावा मिळू शकतो. काही सहकारी बॅंका 7 ते 7.50 टक्के आणि स्मॉल फायनान्स बॅंका 8 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त व्याज देऊ करीत आहेत. पण जिथे व्याज जास्त, तिथे जोखीमही जास्त हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

2) अल्पबचत योजना : प्रामुख्याने पोस्ट ऑफिस आणि निवडक बॅंकांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या योजनांवर आता 5.50 ते 7.60 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जात आहे. “पीपीएफ’सारख्या अपवादात्मक योजनेचे व्याज करमुक्त आहे. सुरक्षितता ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे.

3) कंपनी एफडी : काही वित्तीय कंपन्या एफडी स्वीकारत असतात. बॅंका व पोस्टाच्या तुलनेत त्यांचा व्याजदर एक-दीड टक्‍क्‍यांनी जास्त असतो. आज “ट्रीपल ए’ रेटिंग असलेल्या एचडीएफसी लि., एलआयसी हाऊसिंग फायनान्स, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, आयसीआयसीआय होम फायनान्स, बजाज फायनान्स, महिंद्र फायनान्स, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स यासारख्या कंपन्या 7.50 ते 8.75 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज देत आहेत. पण यातील बहुतांश कंपन्या खासगी असून, सध्याच्या परिस्थितीत त्यातील जोखीमही वाढलेली असू शकते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

4) भारत बॉंड इटीएफ : “ट्रीपल ए’ रेटिंग असलेल्या सरकारी कंपन्यांच्या बॉंड्‌समध्ये गुंतवणूक करणारा हा बॉंड इटीएफ आहे. यात 17 एप्रिल 2023 आणि 17 एप्रिल 2030 रोजी मॅच्युअर होणाऱ्या दोन पर्यायांचा समावेश आहे. त्यावर अनुक्रमे 6.35 आणि 7.43 टक्के परतावा अपेक्षित आहे. वार्षिक 4 टक्के चलनवाढ गृहित धरून करपश्‍चात परतावा बघितला तरी अनुक्रमे 5.81 आणि 6.73 टक्के परतावा मिळू शकतो. या बॉंड इटीएफमधील गुंतवणूक मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत बाळगली तर इंडेक्‍सेशनचा लाभ मिळू शकतो. परतावा आणि तरलता यांचा विचार केला तर सेकंडरी मार्केटमधील टॅक्‍सफ्री बॉंडच्या तुलनेत हा बॉंड इटीएफ अधिक चांगला पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या टॅक्‍सफ्री बॉंडवर 5.25 ते 5.75 टक्के इतकाच परतावा मिळतो.

5) आरबीआय बॉंड : घसरत्या व्याजदराच्या काळात सात वर्षे मुदतीचे व 7.75 टक्‍क्‍यांचा परतावा देणारे भारत सरकारचे रोखे (आरबीआय बॉंड) हा आकर्षक पर्याय दिसून येतो. क्रेडिट रिस्क नसलेले हे बॉंड सुरक्षिततेच्या आघाडीवर सर्वोत्तम ठरत असले तरी तरलतेच्या बाबतीत काहीशी निराशा करतात. यात सहामाही व्याज (असंचयी) किंवा मुदतीनंतर एकत्रित (संचयी) रक्कम घेण्याचा पर्याय आहे. याचे व्याज वार्षिक तत्वावर मोजले जाते आणि असंचयी पर्यायात सहामाही तत्वावर दिले जाते. व्याजाचे उत्पन्न करपात्र असून, उद्‌गम करकपात (टीडीएस) होते. गुंतवणूकदाराच्या टॅक्‍स स्लॅबनुसार कर लागू होतो. उदा. 30 टक्के स्लॅबमधील गुंतवणूकदाराचा करपश्‍चात परतावा 5.42 टक्‍क्‍यांवर येतो. ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांना वयाच्या टप्प्यानुसार चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वर्षानंतर म्हणजे मुदतपूर्तीपूर्वी बाहेर पडण्याची मुभा आहे, अर्थातच व्याजात कपात करून! इतरांना तसा पर्याय उपलब्ध नाही. हे बॉंड सेकंडरी मार्केटमध्ये विकता येत नाहीतच शिवाय ते तारण ठेवून कर्जही मिळू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here