असे बनवा चमचमीत चिकन घी रोस्‍ट; रेसिपी वाचा एका क्लिकवर

नॉनव्हेजप्रेमींना चिकनचा एखादा पदार्थ पाहिला की लगेच तोंडाला पाणी सुटतं, आणि त्यातही तो चमचमीत असेल तर मग कधी तो पदार्थ बनवून खाईन असं होतं. असाच एक चमचमीत पदार्थ आज आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. चिकन घी रोस्‍ट.

तर साहित्य घ्या मंडळीहो.

 • ५०० ग्रॅम्स चिकन ( विथ बोन्स ) , स्वच्छ धुऊन आणि साफ करून
 • ४-५ टेबलस्पून तूप
 • ½ कप दही ( १२५ ग्रॅम्स )
 • ½ टीस्पून हळद
 • 1 टेबलस्पून लिंबाचा रस
 • मीठ
 • 1 टेबलस्पून चिंच
 • 1.5 टेबलस्पून गूळ
 • 10-12 कढी पत्ता
 • घी रोस्ट मसाला बनवण्यासाठी : –
 • 8 बेडगी सुक्या लाल मिरच्या
 • 6 गुंटूर सुक्या लाल मिरच्या (गुंटूर नसेल तर कोणत्याही तिखट लाल मिरच्या वापरल्या तरी चालतील )
 • ½ टीस्पून मोहरी
 • 1 टीस्पून जिरे
 • ½ टीस्पून लवंग ( ६ ते ८ )
 • ¼ टीस्पून मेथीचे दाणे
 • 1 टीस्पून काळी मिरी
 • 1.5 टेबलस्पून धणे
 • 12-15 लसणीच्या पाकळ्या

हे साहित्य घेतले असेल तर बनवायला पण घ्या, हा चिकनचा पदार्थ बनवण्यासाठी वेळ लागेल कारण पदार्थ पण स्पेशल आहे मंडळीहो.

 1. सर्वप्रथम आपण चिकनचे मॅरिनेशन तयार करून घेऊ. एका मोठ्या बाऊल मध्ये हळद , मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र मिसळून घेऊ. त्यातच दही घालून एकत्र मिसळून घेऊ. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत.
 2. चिकनचे तुकडे यात घालून चांगले मिसळून घ्यावेत. या मॅरिनेशन मध्ये २ तासांसाठी चिकन फ्रिजमध्ये राहू द्यावे.
 3. आता आपण घी रोस्टचा मसाला बनवून घेऊ. थोड्या गरम पाण्यात लाल सुक्या मिरच्या आणि दुसऱ्या वाटीत १-२ टेबलस्पून गरम पाण्यात चिंचेचा गोळा बुडवून ठेवू.
 4. मसाले तुपावर भाजून घेण्यासाठी १ टीस्पून तूप एका पॅनमध्ये गरम करून घेऊ. तूप वितळले कि त्यात धणे , काळी मिरी , मोहरी , लवंग, मेथी दाणे आणि जिरे मंद आचेवर भाजून घेऊ. मसाल्यांचे सुवास दरवळे पर्यंत तुपात खमंग भाजून घेऊ. १ ते दीड मिनिटे भाजून घेतल्यावर मसाले एका ताटलीत काढून थंड होऊ देऊ.
 5. एका मिक्सरच्या भांड्यात हे मसाले, भिजवलेली चिंच पाण्यासहीत, लसूण , भिजवलेल्या लाल मिरच्या घालन बारीक पेस्ट वाटून घ्यावी. मसाला वाटण्यासाठी मी १/२ कप पाणी वापरले आहे.
 6. आता आपण चिकनला तुपात परतून घेऊ. ज्या पॅन किंवा कढई मध्ये आपण मसाला भाजला आहे त्यातच २ टेबलस्पून तूप घालून घेऊ. गरम तुपात चिकन चे तुकडे घालून मोठ्या आचेवर ३ मिनिटे परतून घेऊ. ३ मिनिटांनंतर मंद आचेवर चिकन झाकण घालून शिजू द्यावे.
 7. १५ मिनिटे आपण चिकन मंद आचेवर शिजवून घेतले आहे. चिकन एका ताटलीत काढून घेऊ. त्याच कढईत अजून २टेबलस्पून तूप अजून घालून घेऊ. या रेसिपीची खरी चव तूपामुळेच येते.

  म्हणून तूप घालताना अजिबात हात आखडता घेऊ नये. वाटलेला मसाला तुपात घालून घ्यावा आणि सोबतीला मीठही घालावे. हा मसाला तुपात चांगला परतून घ्यावा.
 8. ५-६ मिनिटे मसाला मंद आचेवर परतून घेतल्यावर कडेने तूप सुटायला लागते. चिकन घालून मसाल्यात मिसळून घ्यावे. पाणी अजिबात घालू नये. झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
 9. चिकन १० मिनिटे जवळजवळ शिजू दिले आहे. आता गूळ आणि कढीपत्ता घालून फक्त २- ३ मिनिटे मोठ्या आचेवर शिजवावे जेणेकरून जर जास्तीचे पाणी चिकन मध्ये राहिले असेल तर सुकून जाईल . चिकन घी रोस्ट मसालेदार असते फार जास्त पातळ नाही . २-३ मिनिटांनंतर गॅस बंद करावा आणि चिकन घी रोस्ट वाढेपर्यंत झाकून ठेवावे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here