‘त्या’ आठजणांकडे आहे शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व; वाचा, या जिगरबाज मंडळींविषयी माहिती

दिल्ली येथील शेतकरी आंदोलन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशासमोर मोठे आव्हान बनले आहे. कॉर्पोरेटधार्जिण्या कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश येथील लाखो शेतकरी दिल्लीनाजीकच्या रस्त्यांवर आहेत. त्यांचे नेतृत्व आठजण अभ्यासू नेते करीत आहेत. त्या सर्व जिगरबाज शेतकरी नेत्यांबद्दल थोडक्याट माहिती अशी :

डॉक्‍टर दर्शन पाल हे नाव सध्या सगळ्या वृत्तवाहिन्यांवर दिसते. कारण, त्यांनी या आंदोलनाला दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. डॉ. पाल हे 70 वर्षीय असून 2002 मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडून शेतीमध्ये काम सुरू केले होते. ते सध्या क्रांतिकारी किसान यूनियनचे पंजाब राज्याचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन समितिच्या वर्किंग ग्रुपचे सदस्य असलेले डॉ. पाल जून महिन्यापासून या तिन्ही कायद्यामुळे शेतकरी कसा देशोधडीला लागणार याची माहिती देत आहेत.

यामधील दुसरे आघाडीचे नाव म्हणजे जगमोहन सिंग पटियाला. त्यांचे वय 64 वर्षे आहे. पंजाब सरकारच्या सहकर विभागात ते नोकरीला होते. ट्रेन्‍ड एक्‍यूपंचरिस्‍ट असलेले पटियाला 15 वर्षांपूर्वी भारतीय किसान युनियन यांच्यासमवेत काम करीत होते. वेगवेगळ्या संघटनांना एकत्र ठेवण्याचे मोठे काम ते सध्या करीत आहेत.

बलदेव सिंह सिरसा हे दिल्ली बॉर्डरवरील सिंघु बॉर्डर येथील आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, नव्या कायद्यामुळे कशा पद्धतीने हमीभाव हा मुद्दा बासनात गुंडाळला जाणार आहे. तसेच करार शेती करण्याच्या मुद्द्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदे रद्द करण्याची त्यांची मागणी आहे.

जोगिंदर सिंह उगराहां हे आणखी एक मोठे शेतकरी नेत्यांचे नाव आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी 2002 मध्ये भारतीय किसान यूनियनमध्ये कामाची सुरुवात केली. आताही सरकारशी संवाद करताना ते शेतकऱ्यांची बाजू आग्रहाने मांडत आहेत.

संवादातून मार्ग काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले बलबीर सिंह राजेवाल हेही सरकारशी चर्चा करण्याच्या कोअर टीमचे मेंबर आहेत. 1990 च्या दशकात ते भारतीय किसान यूनियन समवेत होते. मात्र, बाहेर पडूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम चालू ठेवले. सध्या ते सरकार आणि आंदोलक यांच्यात संवादासाठी सेतू बंधन करीत आहेत.

उत्तरप्रदेश राज्यातील शेतकरी नेते राकेश टिकैत हेही आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेले आहेत. दिवंगत लोकप्रिय शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांचे ते पुत्र आहेत. शेतकऱ्यांचा त्यांना जोरदार पाठींबा आहे. त्यांनीही यातील जाचक अटीकडे लक्ष वेधून हे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

किसान एकता मंच याचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष बूटा सिंह म्हणजे एक तेजतर्रार नेता. सरकारचे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी समजावून सांगण्यात यश मिळवले आहे. आताही ते कायदे मागे घेण्यासाठी दबाव टाकीत आहेत. सरकारने संवाद साधण्यास वेळ लावल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

किसान मजदूर संघर्ष समितिचे सतनाम सिंह पन्‍नू हेही कोअर कमिटीत आहेत. ते पंजाबमधील भूमिहीन शेतकरी आणि गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न आग्रहाने मांडतात. 65 वर्षीय पन्नू यांनी तरुण आणि महिलांना या आंदोलनाशी जोडण्यात यश मिळावले आहे.

अशा पद्धतीने हे आठ शिलेदार देशातील शेतकऱ्यांचा आवाज बनून हमीभाव मोडीत काढण्याच्या आणि करार शेतीमध्ये शेतकऱ्यांना न्याय न मिळण्याच्या भूमिकेला विरोध करीत आहेत. त्यांना देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

स्त्रोत : नवभारत टाईम्स आणि गुगल

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here