पवारांच्या चुप्पीमुळे वाढतेय चर्चा; आंदोलनावरील राष्ट्रवादीची ठोस भूमिका होईना जगजाहीर

माजी मुख्यमंत्री व कृषिमंत्री शरद पवार साहेबांचे शेतीच्या उन्नतीमधील स्थान अनन्यसाधारण असेच आहे. त्यांच्या कार्यकाळात देशात खऱ्या अर्थाने अन्नसुरक्षा हा मुद्दा निकाली निघायला सुरुवात झाली. त्याच पवार साहेबांनी अजूनही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत अधिकृतरीत्या जाहीर भूमिका मांडलेली नाही. राष्ट्रवादीचे इतर नेते व प्रवक्ते त्यावर भूमिका मांडीत असले तरी कृषी सुधारणा विधेयकावर मतदान करताना संसदेत हजर नसलेल्या पवार साहेबांच्या चुप्पीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

सामाजिक-राजकीय अभ्यासक हर्शल लोहोकरे यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, राज्यसभेत कृषी विधेयक पारित करताना राज्यातील शेतकऱ्यांचे नेते व महाविकासआघाडीचे निर्माते राज्यसभा खासदार शरद पवार गैरहजर राहिले होते. दिल्लीत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी विधेयकातील तीन तरतुदींवरून तीव्र आंदोलन सुरू केले आहे व हे विधेयक रद्द करण्याची मागणी ते करत आहेत. राज्यातील अनेक संस्था, संघटना, अभ्यासक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष तिथे जाऊन, अनेकांनी फेसबुकसह पत्रके काढून पाठींबा दिला आहे. शरद पवारांनी या आंदोलनाबाबत काही मत व्यक्त केल्याचे आपल्याला वाचायला मिळाले का ?

अशाच पद्धतीने इतरही अनेकांनी शरद पवार यांनी अजूनही भूमिका जाहीर न केल्याने आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. देशभरात सध्या दिल्लीतील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जोरदर दबाव असताना पवार साहेबांची राष्ट्रवादी त्या तुलनेत अजूनही पुढे येताना दिसत नाही. काँग्रेस पक्षाने थेट सहभागी न होऊनही शेतकऱ्यांना आपला पाठींबा व्यक्त करण्यासाठी रस्त्यांवर उतरण्याचे किमान काहीतरी प्रयत्न केलेले असतानच मोदीजींचे गुरू पवार साहेब नेमके शांत का, हा अवघ्या देशाला पडलेला प्रश्न आहे.

जर पवार साहेब व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कृषी सुधारणा विधेयक योग्य वाटत असतील तर त्यांनी तशीही आपली भूमिका जाहीर करण्यास अजिबात हरकत नाही. मात्र, प्रवक्ते व कार्यकर्ते कृषी विधेयकाच्या विरोधात व्यक्त होत असताना पवार साहेबांनी नेहमीप्रमाणे आपली ठोस भूमिका जाहीर न करून संभ्रम वाढवला आहे. त्याचे नेमके कारण कधी स्पष्ट होणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here