‘त्या’ मुद्दयावरुन राऊतांचा थेट न्यायालयावर निशाणा; ‘तेव्हा’ कोणतेही न्यायालय…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ या सदरातून भाजपसह न्यायालयावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे ‘रोखठोक’मध्ये :-

मुंबईत राहणाऱया एका बेताल नटीने सुशांत राजपूतप्रकरणी बिनबुडाचे आरोप केले. मुंबईला पाकिस्तान, शिवसेनेला बाबर सेना, पोलिसांना माफिया म्हटले. यावर लोकांत संताप झाला. या नटीने नैतिकतेच्या गप्पा मारल्या, पण तिची कृत्ये बेइमानीचीच होती. ती पूर्वायुष्यात अमली पदार्थांचे सेवन करीत असे. त्याबाबत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱया एका रॅकेटची ती सदस्य होती. तिने बेकायदेशीर बांधकाम करून ऑफिस थाटले होते. हे बेकायदा बांधकाम मुंबई पालिकेने बुलडोझर लावून तोडले. लोकांनी या कारवाईचे स्वागत केले. भाजपला या कारवाईचे अतीव दुःख झाले. बेकायदा बांधकाम तोडणे हा अन्याय आहे असे ते म्हणतात. पण न्यायालयानेही जणू त्या नटीच्या बेकायदा बांधकामावर झेंडू, मोगऱ्याची फुलेच उधळली आणि नटीचे बेकायदा बांधकाम तोडले म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेवर दंड ठोठावला. नटीस भरपाई देण्याचे आदेश दिले.

मुंबईच्या रस्त्यांवरील पोटार्थी फेरीवाल्यांना बेकायदेशीर ठरवून हटवले जाते तेव्हा कोणतेही न्यायालय त्या गरीबांच्या मागे उभे राहत नाही. ‘प्रतिभा’पासून ‘आदर्श’पर्यंत बेकायदा बांधकामाबाबत न्यायालयाचे आदेश व निरीक्षणे नटीच्या निर्णयाशी मेळ खात नाही. आदर्शचे बेकायदा बांधकाम प्रकरण तर भाजपनेच लावून धरले होते व आता ताजी गरमागरम खबर अशी की, हैदराबाद महानगरपालिकेच्या प्रचार सभेत स्वतः गृहमंत्री अमित शहा गरजले आहेत, हैदराबादच्या जनतेने भाजपला फक्त एकदा संधी द्यावी, हैदराबादमधील सर्व बेकायदेशीर बांधकामे हटवू, पण मुंबईतील नटीच्या बाबतीत तिचे बेकायदा बांधकाम म्हणजे प्रतिष्ठेचे शिखर आहे. त्यास हात लावायचा नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here