आता राऊतांनी पाजले राहुल गांधींना राजकीय उपदेशाचे डोस; ‘त्यांचे’ केले समर्थन

मुंबई :

पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘पवार यांचे बोलणे हे काँग्रेसनं मार्गदर्शन म्हणून स्वीकरलं पाहिजे. आम्ही देखील त्यांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर शिवसेना पक्षप्रमुख आहेत. ते देखील शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात’, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी थेट राहुल गांधींना राजकीय उपदेश केला आहे. ते म्हणाले की, शरद पवारांना दांडगा अनुभव आहे. ते जेव्हा काही बोलतात तेव्हा त्यांचा अभ्यास असतो. त्यामुळे त्यांच्या अनुभवापेक्षा कमी असलेल्या राहुल गांधी यांनीच नाही तर कुणीही त्यांचं बोलणं हे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. कारण सगळ्यांनाच पंडित नेहरू, नरेंद्र मोदी तर शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकाला काही ना काही मर्यादा असतात तशा राहुल गांधींमध्येही आहेत. त्यांनी त्या स्वीकारायला हव्या.

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींचे कौतुकही केले आहे. राऊत म्हणाले की, काँग्रेसला राहुल गांधी यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, राहुल गांधींच्या नेतृत्त्वाबात आतापर्यंत भाजपकडून वारंवार सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही राहुल गांधी थोडेही डगमगले नाहीत. राहुल गांधी कुठेही आपल्या परिश्रमात कुठेही कमी पडत नाही. मात्र, राहुल यांना नशीब साथ देत नाही आहे. त्यात प्रश्न आला शरद पवार यांच्या बोलण्याचा तर त्यांचं बोलणे हे काँग्रेसनं मार्गदर्शन म्हणून स्वीकरलं पाहिजे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here