आरबीआयच्या निर्णयामुळे लोकांवर होणार असा परिणाम; ‘हे’ 4 मुद्दे घ्या समजून

दिल्ली :

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक बुधवारपासून सुरु करण्यात आली आहे. या बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या मुद्द्यांवर आज निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) डिसेंबरच्या आर्थिक आढावा बैठकीत पुन्हा एकदा मुख्य व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. किरकोळ महागाईच्या उच्च स्तराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

किरकोळ चलनवाढ सध्या रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक पातळीच्या वर आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील 6-सदस्य समितीने (एमपीसी)  रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर अबाधित ठेवला आहे. रेपो दर 4%, रिव्हर्स रेपो दर 3.35%, रोख राखीव प्रमाण 3% आणि एमएसएफ दर आणि बँक दर 4.25% च्या पातळीवर कायम आहेत.

आरबीआयच्या निर्णयाचा बँक ग्राहकांवर कसा परिणाम झाला ते पाहूया…

1) रेपो रेटशी संबंधित गृह कर्जाच्या दरामध्येही बदल झालेला नाही. म्हणूनच गृहकर्ज घेणार्‍या ग्राहकांची ईएमआयसुद्धा तशीच आहे.

2) एमसीएलआर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडावर आधारित कर्ज दर 12 किंवा 6 महिन्यांनी बॅंक बदलतात. एमसीएलआरला जोडलेले गृह कर्ज रेपो रेट लिंक्ड होम लोनपेक्षा वेगळे आहे. म्हणूनच एमसीएलआर लिंक्ड गृह कर्जाची ईएमआय जेव्हा बँका त्यांच्या धोरणांनुसार रीसेट कालावधीत दर कमी करतात तेव्हाच कमी होते. म्हणजेच रेपो दरात कपात किंवा वाढ केल्याने तुमच्या एमसीएलआरशी संबंधित कर्जाचा दरही कमी होईल किंवा वाढेल, हे आवश्यक नाही.

3) साथीच्या आजारामुळे रेपो दरात सद्य कपातीमुळे एफडी दरही खाली आला आहे. जर बॅंकांनी कमी दराने व्याज दिले तर ते शिल्लक ठेवण्यासाठी एफडीवरील परतावा देखील कमी करतात. एफडीवर कमी व्याज दर ज्येष्ठ नागरिकांसारख्या जोखीम घेण्यास सक्षम नसलेल्या ग्राहकांसाठी चिंतेची बाब आहे. आरबीआयने रेपो दर कायम ठेवला असल्याने एफडी दरात आणखी कपात होण्याची शक्यता नाही पण त्यात वाढ होण्याचीही शक्यता नाही.

4) कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या मदतीने लोकांना अधिकाधिक सहज व्यवहार करता यावेत यासाठी एमपीसीच्या बैठकीत कॉन्टॅक्टलेस कार्डची मर्यादा 5000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ही मर्यादा 2000 रुपये आहे. ही वाढीव मर्यादा 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here