मोठी बातमी! MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन; ‘असा’ थांबला प्रेरणादायी प्रवास

मुंबई :

देशातील दिग्गज मसाला कंपनी एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. सकाळी 5.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 98 वर्षांचे होते. कोरोनाहून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

गुलाटीचा जन्म 27 मार्च 1923 रोजी सियालकोट (पाकिस्तान) येथे झाला होता. 1947 मध्ये देशाचे विभाजन झाल्यानंतर ते भारतात आले. तेव्हा त्यांच्याकडे फक्त 1,500 रुपये होते. भारतात आल्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या देखभालीसाठी टांगा चालवायला सुरुवात केली. थोडे पैसे जमल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला. मग लवकरच त्यांच्याकडे इतकी रक्कम जमा झाली की ज्यातून दिल्लीच्या करोल बाग, अजमल खान रोडवर मसाल्यांचे दुकान उघडले जाऊ शकत होते.

आजमितील MDH मसाले भारतात सर्वात प्रसिद्ध आणि त्यातही लाल तिखट आणि काश्मीरी तिखट देखील खूप प्रसिद्ध आहे. धरम पाल गुलाटी यांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले होते. पुढील शिक्षणासाठी ते शाळेत गेले नाहीत. त्यांनी भलेही शालेय शिक्षण घेतले नसेल, पण मोठे व्यापारी नेते त्यांना आपला गुरु मानत. युरोमोनिटरच्या म्हणण्यानुसार धरमपाल गुलाटी हे एफएमसीजी क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सुत्रांनी सांगितले की, 2018 मध्ये त्यांना 25 कोटी रुपये इन-हैंड पगार मिळाला होता. गुलाटी आपल्या पगाराच्या 90 टक्के रक्कम दान करायचे. ते 20 शाळा आणि 1 रुग्णालयही चालवित होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here