सुपरस्टार रजनीकांत करणार ‘अशा’ हटके पद्धतीने राजकारणात एन्ट्री; केली ‘ही’ मोठी घोषणा

चेन्नई :

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी आज एक ट्विट करत ही घोषणा केली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले होते की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात. 2021 मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही. रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटले होते की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.

याआधी रजनीकांत यांनी आपल्या जिल्हा सचिवांसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी पक्ष स्थापनेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आपण लवकरात लवकर याबाबतची घोषणा करू, असे त्यांनी बैठकीत सांगितले होते. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका 2021 मध्ये होणार आहेत. आपल्या पक्षाचे 60 ते 65 टक्के उमेदवार 45 ते 50 वर्षांचे असतील, अशी घोषणा रजनीकांत यांनी केली होती. तर इतर जागांवर प्रतिष्ठीत, न्यायाधीश, माजी सनदी अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात येईल, असेही ते म्हणाले होते.

रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 मध्ये आध्यात्मिक राजकारण करण्यासोबत 2021 मध्ये तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. आता जानेवारीमध्ये रजनीकांत पक्ष स्थापन करणार असून 31 डिसेंबरला याबाबतची घोषणा करणार आहेत. त्यांच्या चाहत्यांसह तामिळनाडूतील जनतेला त्यांच्या पक्षाबाबत उत्सुकता आहे.

संपादन : स्वप्नील पवार   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here