मध घेताना सावधान… पतंजलीसह ‘या’ ३ बड्या कंपन्यांवर आहे मधात भेसळ केल्याचा आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

मुंबई :

भारतीय बाजारात विकल्या जाणार्‍या सर्व ब्रॅण्डच्या मधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. साखरेच्या पाकाचा वापर भेसळ करण्यासाठी केला जात आहे, असा खुलासा विज्ञान व पर्यावरण केंद्राने  केला आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट यांनी देशामध्ये विकल्या जाणार्‍या 13 मोठ्या ब्रॅण्डचे मध भेसळ चाचणीसाठी जर्मनीला पाठविले होते. हे सर्व ब्रँड भारतात भेसळ चाचणीत टिकले मात्र जर्मनीमध्ये झालेल्या भेसळ चाचणीत हे सर्व ब्रँड अयशस्वी झाले.

सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट 2003 आणि 2006  या वर्षात सॉफ्ट ड्रिंकमध्ये कीटकनाशक असल्याचा खुलासा केला होता. यानंतर बरीच खळबळ उडाली होती. आता पुन्हा मधात असलेल्या भेसळीबाबत खुलासा केल्याने भारतीय मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. पतंजलि, डाबर, वैद्यनाथ, झंडू या ब्रॅण्डचे मधही चाचणीसाठी पाठवले होते. यातही भेसळ आढळून आली आहे.

दरम्यान डाबर आणि पतंजली या दोन्ही कंपन्यांनी दाव्याचे खंडन केले आहे. कंपन्यांनी म्हटले आहे की, हे दावे  प्रवृत्त वाटतात आणि ब्रँड्सची प्रतिमा खराब करणे हे त्यांचे लक्ष्य आहे.

त्यांनी विकलेले मध हे भारतीय स्त्रोतांकडून नैसर्गिकरित्या गोळा केले जाते आणि साखर न मिसळता किंवा भेसळ न करता मध पॅकिंग केले जाते, असे कंपन्यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर कंपन्यांच्या मते, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएएआय) मध चाचणीसाठी ठरविलेले नियम व निकष पाळले जातात.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here