तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही; शिवसेनेने साधला ‘त्यांच्यावर’ निशाणा

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज योगी आदित्यनाथ, फिल्मसिटी आणि राजकारण या विषयाला घेऊन भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळय़ांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे. योगींचा हा विचार चांगलाच आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्म सिटी मुंबईतच का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही?’ याचे उत्तर दडले आहे. शिवाय फिल्म सिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही. उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आहे. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे. मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते. मुंबईतील ‘अंडरवर्ल्ड’वरही सिनेमे निघालेच होते, पण महाराष्ट्राने ही गुंडगिरी मोडून काढली. ‘मिर्झापूर’मध्ये दाखविलेले

उत्तर प्रदेशचे वास्तव

बदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार? मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय? उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता? मुंबईला का ओरबाडता? मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांतदेखील आहे. हैदराबादेत आहे. तामीळनाडू, आंध्रात आहे. योगी महाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीचे कार्य पुढे नेणार आहेत काय? उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-1 व 2’ या वेब सीरिजमध्ये आहे.

बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे. योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे यावर काय मत आहे? की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे? एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱया ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here