मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज योगी आदित्यनाथ, फिल्मसिटी आणि राजकारण या विषयाला घेऊन भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले. ‘ट्रायडण्ट’च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली. योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे. योगी महाराज आता सिने उद्योगात उतरणार असल्याने त्यांनी अशा विषयाकडे मनोरंजनाचा भाग म्हणून पाहायला हवे. योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉक डाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत.
मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार? त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये? पण हे द्वारकाधीशही मुंबईतच सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्याचा निष्कांचन मित्र सुदामा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या बदल्यात सुदाम्याची संपूर्ण नगरीच सोन्याची करून टाकली.
संपादन : स्वप्नील पवार
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट