सामान्यांना नको, ‘आधी’ लोकप्रतिनिधींना द्या कोरोना लस; ‘या’ शिवसेना नेत्याने केली अजबच मागणी

मुंबई :

कोरोनाची लस आता लवकरच येणार असून टप्प्याटप्प्याने ती सर्वांना दिली जाणार आहे. कोरोना लसीकडे सर्वांचे डोळे लागले असताना एका शिवसेना नेत्याने कोरोना लसीबाबत अजब-गजब मागणी केली आहे. कोरोनाची लस आल्यानंतर ती सर्वप्रथम नगरसेवक, आमदार आणि खासदारांना द्यावी, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.   

काही कंपन्यांनी येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला लस येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, कोणतीही लस पूर्ण प्रभावी नसून कोरोना महामारी रोखण्यात यश येणार का, याबाबत संशोधकही साशंक आहेत. अशा परिस्थितीतही म्हस्के यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आम्ही ज्यांना निवडून दिलं ते आपल्या स्वार्थाचा विचार करत आहेत. निवडणुका आल्या की जनतेसमोर लोटांगण घालणारे हे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर मात्र मतदारांनाच विसरतात, अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांमधून येत आहेत.

दरम्यान या विधानाचे स्पष्टीकरण देताना म्हस्के म्हणाले की, लोकप्रतिनिधी हे कायम लोकांच्या संपर्कात असतात. कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलं आहे. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त होता किंबहुना आहे. यामुळे लोकप्रतिनिधींना आधी लस द्यावी.

नेमकं काय म्हटलं आहे म्हस्के यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात :-

स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही आपला जीव धोक्यात घालून कोरोनारुग्णांची अहोरात्र सेवा केली असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रकमाने समावेश करावा.                   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here