रिलायन्सच्या शेअर्समध्ये 5% तोटा; अंबानींना मोठा झटका, चुकवू शकले नाहीत ‘या’ बँकांचे कर्ज

मुंबई :

पैशाअभावी धडपडत असलेल्या अनिल अंबानी ग्रुप कंपन्यांच्या समस्या कमी होत नाहीयेत. आता एचडीएफसी आणि अ‍ॅक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजाची परतफेड करण्यात रिलायन्स कॅपिटल अपयशी ठरली आहे. कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (बीएसई) ही माहिती दिली आहे. कंपनीने एक्सचेंजला सांगितले आहे की 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत एचडीएफसीचे 4.77 कोटी रुपये आणि अ‍ॅक्सिस बँकेचे 71 लाख रुपये व्याज भरण्यात अंबानी अपयशी ठरले आहेत. तथापि, या दोन्ही कर्जदारांची मूळ रक्कम भरण्यात आली असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या डिफॉल्ट बातमीनंतर आज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. रिलायन्स कॅपिटलचा शेअर आज जवळपास 5 टक्क्यांनी घसरून 9.30 रुपयांवर आला. मागील दिवशी कंपनीचा शेअर 9.75 रुपयांवर बंद झाला होता. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 16.20 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 3.70 रुपये आहे. रिलायन्स कॅपिटलची मार्केट कॅप 234 कोटींवर आली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत रिलायन्स कॅपिटलचे  2,577  कोटींचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, एक वर्षापूर्वी सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे नुकसान केवळ 96 कोटी रुपये होते. सप्टेंबर 2020-21 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल घटून 4,929 कोटी रुपयांवर गेला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात 5,064 कोटी होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here